रत्नागिरी : पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने कोकणात आॅटोमोबाईल क्षेत्रावर आधारित उद्योग प्रामुख्याने आणण्याचा प्रयत्न राहील. त्याचबरोबर कोकणात आयात सुविधाही निर्माण कराव्या लागतील. कोकणचे प्रदूषणविरहीत औद्योगिकीकरण करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांना दिली. विजयी मिरवणुकीसाठी रत्नागिरीत आले असता राऊत यांची पत्रकारांनी भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे व यापुढेही राहणार आहे. आपल्या विजयाबद्दल मतदारांचे आभार मानताना ते म्हणाले, या लोकसभा मतदारसंघातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे दहशत जास्त काळ चालत नाही, हेच जनतेने दाखवून दिले. या सहाही विधानसभा मतदारसंघातील विधानसभेच्या सहा जागा यावेळी महायुतीच जिंकणार असून, राज्यातही महायुती निर्विवाद बहुमत मिळवेल. राज्यातही सत्ता परिवर्तन होऊन विधानसभेवर भगवा फडकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दशकभरापेक्षा अधिक काळ कॉँग्रेस आघाडीकडे सत्ता असतानाही कोकणचे प्रश्न सुटले नाहीत. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळेच कोकण विकास रखडला आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी केंद्राकडून निधी आणण्यासाठी आपण जोरकस प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
प्रदूषणविरहीत उद्योग उभारणीवर भर : राऊत
By admin | Updated: May 31, 2014 01:11 IST