राजापूर : शहरातील अर्जुना आणि कोदवली नदीपात्रातील गाळ उपशाच्या प्रश्नाबरोबरच तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीचे नूतनीकरण करणे आणि सर्वसामान्य जनतेच्या कामाचा झटपट निपटारा करून लोकाभिमुख प्रशासकीय कामकाज करण्यावर आपला भर राहील, असे संकेत राजापूरच्या नूतन तहसीलदार शीतल जाधव यांनी दिले आहेत.
राजापूर ही आपली जन्मभूमी असल्याने इथले प्रश्न आणि समस्यांची आपणाला चांगली जाणीव आहे. सर्वसामान्य जनतेच्या कामाला प्राधान्य देताना महसूल प्रशासनाच्या कामातून त्यांना न्याय आणि समाधान देण्याचा आपण प्रयत्न करू, अशी ग्वाहीही जाधव यांनी दिली. राजापूर तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजापूर शहर आणि तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत माहिती करून घेताना भविष्यात राजापुरातील पूर संकट कमी करण्यासाठी शहरातील अर्जुना आणि कोदवली नदीपात्रातील गाळ उपशाच्या प्रश्नाला प्रशासकीय पातळीवरून कशी चालना देता येईल, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. राजापूर तहसीलदार कार्यालयाची इमारत जुनी असून, सध्या पावसाळ्यात अनेक ठिकाणी त्याला गळती लागली आहे. याबाबत संबंधित विभागाशी चर्चा करून या इमारतीच्या नूतनीकरणासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शीतल जाधव यांनी सांगितले की, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची आणि समस्यांची आपणाला चांगली जाण आहे. त्यामुळे ते प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू. पुढील दोन महिन्यात प्रशासकीय कामकाजात चांगली गती आलेली दिसेल, असेही त्यांनी सांगितले. जनतेच्या कामासाठी आपण कायमच उपलब्ध राहणार असून, सर्वसामान्यांच्या कामाचा झटपट निपटारा करून तत्काळ न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही जाधव यांनी सांगितले. यावेळी नायब तहसीलदार अशोक शेळके उपस्थित होते.