रत्नागिरी : हजारांचे कर्ज व्याज भरूनही लाखांच्या घरात गेल्याने जगायचे कसे? दागिने, जमिनी, बागा विकून कर्ज फिटत नसल्याने संसाराचा गाडा चालवायचा कसा? असे प्रश्न मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या आर्थिक शोषणामुळे त्रस्त झालेल्या महिलांनी उपस्थित केले. फायनान्स कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरोधात दाद मागण्यासाठी रत्नागिरी शहरातील पटवर्धन हायस्कूलच्या सभागृहात जनता दल सेक्युलर आणि कोकण जनविकास समितीने हा एल्गार मेळावा आयोजित केला होता.मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या दादागिरीतून महिलांची सुटका करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. यासाठी उर्वरित कर्जाची वसुली करण्यास मनाई करावी. कर्ज मंजूर करण्यासाठी केलेला करारनामा व अन्य कागदपत्रांच्या प्रती संबंधित महिलांना मिळाव्यात आणि कर्जाच्या रकमेतून केलेली १० टक्के कपात रद्द करून ही रक्कम महिलांना परत करावी, अशी आग्रही मागणी जनता दलाचे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी केली.रिझर्व्ह बँकेचे नियम धाब्यावर बसवत जिल्ह्यात दहाहून अधिक मायक्रो फायनान्स कंपन्यांनी मनमानीपणे कर्जवाटप केले आहे. या दडपशाहीला चाप बसण्यासाठी कर्नाटक सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही कर्जदारांना संरक्षण देणारा सर्वंकष कायदा करावा. खासगी सावकारांना कमाल वार्षिक १८ टक्के व्याजदराची मर्यादा सरकारने मायक्रो फायनान्स कंपन्यांना लागू करण्याची आग्रही मागणी रिझर्व्ह बँकेकडे करावी, अशा प्रमुख मुद्यांकडे नारकर यांनी लक्ष वेधले.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या नम्रता जाधव, जनता दल मुंबई उपनगर जिल्हाध्यक्ष संजीवकुमार सदानंद, कोकण जनविकास समितीचे प्रमुख संघटक जगदीश नलावडे, सामाजिक संघटक संग्राम पेटकर, जनता दल जिल्हाध्यक्ष युयुत्सू आर्ते यांनीही मार्गदर्शन केले. ज्येष्ठ पत्रकार संजय परब यांनी सूत्रसंचालन केले.
वसुलीच्या जाचामुळे महिलेने संपविले जीवनमायक्रो फायनान्स कंपन्या महिलांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत कर्जावर भरमसाठ चक्रवाढ व्याज आकारत आहे. अनेक महिलांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. यावेळी महिलांनी रात्री अपरात्री घरात घुसून व्याज वसूल केले जात असल्याचे उघड केले. अशा वसुली दलालांच्या जाचामुळे रत्नागिरीजवळील एका महिलेने आपले जीवन संपविले आहे.