कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया
लाेकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : नाणार रिफायनरी प्रकल्प झाला पाहिजे यादृष्टीने प्रयत्न केले जातील, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी राजापूर तालुक्यातील तुळसुंदे येथे केली़ जिल्हा दाैऱ्यावर आलेल्या नाना पटाेले यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा नाणार प्रकल्पाचा विषय चर्चेत आला आहे़
चक्रीवादळाने झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी रविवारी राजापूर तालुक्याला भेट दिली़ या भेटीदरम्यान ते तुळसुंदे येथे आले असता नाणार प्रकल्पाबाबत सूताेवाच केले़ ते म्हणाले की, नाणार रिफायनरी प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरू शकतो, असे आता लोकांचेही मत झालेले आहे. त्या भागात मच्छिमारांचे काही प्रश्न आहेत ते समजून घेतले पाहिजेत. इथल्या जमिनी गुजरातच्या उद्योगपती मित्रांनी घेतलेल्या आहेत. तो प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. कमी भावाने जमिनी घेऊन तेथील शेतकऱ्यांची लूट झालेली आहे. त्यासंदर्भात निर्णय घेतला जावा. नाणार रिफायनरी प्रकल्प झाला पाहिजे यादृष्टीने प्रयत्न केले जातील. त्यामुळे नाणारला नानाच न्याय देऊ शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला़
------------------------
राजापूर तालुक्यातील तुळसुंदे येथील नुकसानग्रस्त भागाची काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी पाहणी केली़