सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेने सार्वजनिक बांधकाम विभाग व कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले. यावेळी विशाल शेले, रंजित डांगे उपस्थित होते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
अडरे : थकीत देयकामुळे सुशिक्षित बेरोजगार अभियंता आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्यामुळे सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेने आंदोलन करण्याचा इशारा सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे दिला आहे. संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष विशाल शेले व रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रणजित डांगे यांनी हे निवेदन दिले.
चिपळूण येथे झालेल्या चर्चेनुसार पाच महिन्यांपूर्वी १०० टक्के निधी सर्व योजनेस प्राप्त करून देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच नवीन निविदा भरताना इएमडी व सुरक्षा अनामत रक्कम भरण्यापासून सूट देण्याचेही आश्वासन दिले होते. परंतु, पाच महिने होऊनही कोणत्याही प्रकारच्या योजनेस १०० टक्के अनुदान आजपर्यंत प्राप्त झालेले नाही. त्यात भर म्हणून १६ मार्च २०२१ रोजी बीडीएस प्रणाली बंद करून शासनाने ठेकेदारांची, सु. बे. अभियंत्यांची, सोसायटी धारकांची क्रूर चेष्टा केली आहे. दि. २२ मार्च २०२१ पर्यंत सर्व योजनेस निधी उपलब्ध झाला नाही, तर दि. २३ मार्च रोजी सर्वत्र तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. यासारख्या आंदोलनांमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडल्यास आपणच जबाबदार असाल, असे या निवेदनात म्हटले आहे. तसेच जोपर्यंत सर्व निधी उपलब्ध होत नाही, तोपर्यंत कोणतीही नवीन निविदा प्रसिद्ध करू नये, अशी मागणी कोकण विभाग अध्यक्ष विशाल शेले, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रणजित डांगे यांनी केली आहे.