रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर संगमेश्वर ते रत्नागिरीदरम्यान मंगळवारी (२९ ऑगस्ट) सकाळी घेण्यात आलेल्या तीन तासांच्या मेगा ब्लॉकमुळे पाच ते सहा गाड्यांचे वेळापत्रक बिघडले. रेल्वेचा हा मेगा ब्लॉक पूर्वनिर्धारित असला तरी विलंबाने धावू शकणाऱ्या संभाव्य गाड्यांशिवाय इतर गाड्यांनाही विलंबाचा फटका बसला. या गाड्यांमध्ये जनशताब्दी एक्स्प्रेससह तेजस एक्स्प्रेसचाही समावेश होता.कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर ते रत्नागिरीदरम्यान मंगळवारी सकाळी ७:३० ते १०:३० वाजता पूर्वनिर्धारित मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी कोकण रेल्वेने हा पूर्वनिर्धारित मेगा ब्लॉक घेतला होता. त्यामुळे तिरुनेलवेली ते जामनगर तसेच तिरुवअनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्स्प्रेस या गाड्या ब्लॉकच्या कालावधीत विलंबाने धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने आधीच जाहीर केले होते.मात्र, प्रत्यक्षात या दोन गाड्यांव्यतिरिक्त इतर गाड्यांनाही विलंबाचा फटका बसला. या मार्गावरील कोईम्बतुर ते जबलपूर ही गाडी २१ मिनिटे, जामनगर एक्स्प्रेस ही गाडी २ तास ५७ मिनिटे, मुंबईकडे जाणारी नेत्रावती एक्स्प्रेस १ तास ३४ मिनिटे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मडगावदरम्यान धावणारी तेजस एक्स्प्रेस एक तास, मुंबईतून मडगावच्या दिशेने येणारी जनशताब्दी एक्स्प्रेस सुमारे अर्धा तास उशिराने धावत होती.संगमेश्वर ते रत्नागिरीदरम्यान घेण्यात आलेल्या मेगा ब्लॉकमुळे पुण्यातील काही गाड्या चिपळूण, सावर्डे, आरवली तर काही गाड्या रत्नागिरीला थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे काेकण रेल्वे मार्गावर घेण्यात आलेल्या मेगा ब्लाॅकमुळे पूर्वनियाेजित दाेन गाड्यांव्यतिरिक्त अन्य गाड्यांनाही विलंबाचा फटका बसला. त्यामुळे प्रवाशांना या मेगा ब्लाॅकचा त्रास सहन करावा लागला.
मेगा ब्लाॅकमुळे काेकण रेल्वेचे वेळापत्रक बिघडले, प्रवाशांना सहन करावा लागला त्रास
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 13:35 IST