रत्नागिरी : चालत्या ट्रकमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका येऊन चालकाचा ट्रकवरील ताबा सुटून तो रस्त्याच्या कडेला कलंडून त्यात चालकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याचा सुमारास परटवणे येथे घडली. याबाबत शहर पोलीस स्थानकात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.
अब्दुल गनी मुर्तुझा पठाण (रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी तो आपल्या ताब्यातील ट्रक (एमडब्ल्यूटी - ९१४६) घेऊन हातखंब्याच्या दिशेने जात होता. गाडी चालविताना त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्याचा ट्रकवरील ताबा सुटला आणि तो रस्त्याच्या कडेला कलंडून अपघात झाला. तेथील नागरिकांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने ट्रकच्या दिशेने धाव घेतली तेव्हा त्यांना चालक बेशुद्ध अवस्थेत दिसला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.