चिपळूण : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांच्या मुलांकडून लाखो रुपये घेऊन त्यांना नोकरी देणाऱ्या भ्रष्टाचारी संचालकांना उमेदवारी देऊ नये, याप्रकरणी येत्या दोन दिवसांत आपण सीआयडीकडे तक्रार अर्ज देणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार रमेश कदम यांनी दिली. जिल्हा बँकेवर निशाणा साधण्यासाठी माजी आमदार कदम यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. जिल्हा बँकेत झालेल्या नोकरभरती प्रकरणावर त्यांनी कडाडून प्रहार केला. या नोकरभरतीची चीरफाड करताना भ्रष्टाचार कसा झाला, हे त्यांनी सविस्तर सांगितले. रमेश कदम म्हणाले की, जिल्हा बँक ही सर्वसामान्य शेतकऱ्याची बँक आहे. शेतकऱ्याच्या हितासाठी व त्याच्या मुलाबाळांना न्याय मिळवून देण्यासाठी त्याची स्थापना झाली आहे. सहकाराच्या माध्यमातून सामान्य माणसाला नवी ऊर्जा मिळावी, त्याची उमेद वाढावी व त्याला आधार मिळावा, यासाठी ही बँक आहे. परंतु, या बँकेत सर्वसामान्य गरीब माणसाच्या हिताचा अजिबात विचार केला जात नाही. जिल्हा बँकेत नोकरभरती करताना संचालकांनी आपल्या मर्जीतील लोकांना व नातेवाईकांना संधी दिली, असा आरोपही कदम यांनी यावेळी बोलताना केला.काहींनी २०-२० लाख रुपये घेऊन नोकरभरती केली. आम्ही सूचवलेल्या गरीब पात्र उमेदवारांचा विचारही झाला नाही. असे पैसे घेऊन नोकरभरती करणाऱ्या संचालकांना मतदारांनी पैसे घेतल्याशिवाय मत देऊ नये किंवा चार शब्द खडसावून सुनावून मतदान करावे. भरतीसाठी उमेदवारांकडून घेतलेले पैसे मतदारांना द्यावेत. कारण पैसे घेऊन भरती करणे हा सभासदांचा अपमान आहे, असेही कदम यांनी सांगितले. सभासदांच्या जीवावर निवडून येणारे संचालक पैसे घेऊन भरती करतात हे अयोग्य आहे. हे घेतलेले पैसे संबंधित संचालकांनी नातेवाईकांना परत द्यावेत किंवा मतदारांना द्यावेत. याप्रकरणी सीआयडी चौकशी व्हावी, असेही माजी आमदार कदम यावेळी म्हणाले. आपल्याला निवडणुकीत कोणी स्पर्धक नको किंवा कोणाची अडचण होवू नये, यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना लाखो रुपयांचे कर्ज देऊन ती थकवण्यात आली आहेत. त्यामुळे मार्गातला अडसर आपोआप दूर झाला आहे. जिल्हा बँक हे भ्रष्टाचाराचे कुरण आहे. येथे वर्षानुवर्षे हा भ्रष्टाचार सुरु आहे. त्यामुळे अशा भ्रष्टाचारी उमेदवारांना उमेदवारी देऊ नये. येथे चांगले उमेदवार निवडून द्यावेत व सहकारात चांगली माणसे यावीत, अशी आपली धारणा आहे, असे ते म्हणाले.जो संचालक भ्रष्टाचार केला नाही असे म्हणत असतील त्यानी आपण मानत असलेल्या देवासमोर नारळ ठेवून तसे स्पष्ट करावे. बँकेकडून सामान्य माणसाच्या अपेक्षा आहेत. परंतु, त्या पूर्ण होत नाहीत. शेतकऱ्यांना योग्य सहकार्य मिळत नाही म्हणून शेतकरी इतर राष्ट्रीय बँकेकडे कर्जासाठी वळले आहेत. बँकेत चांगले उमेदवार निवडून जावेत, असे पत्र चेअरमन तानाजी चोरगे यांनी सभासदांना दिले आहे. त्यामुळे ते पैसे खाणाऱ्या उमेदवारांना संधी देणार नाहीत, अशी अपेक्षा आहे, असे रमेश कदम यावेळी बोलताना म्हणाले. (प्रतिनिधी)जिल्हा बँक आपल्या पक्षाच्या ताब्यात आहे. आपण त्याकडे लक्ष देणार का, यावर ते म्हणाले, मी सहकारात काम करीत नाही. ते माझे क्षेत्र नाही. बँक कोणत्या पक्षाची आहे हे महत्त्वाचे नाही, तर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. ज्यांच्या जीवावर ही बँक उभी आहे ती माणसं जगली पाहिजेत. गरीब ग्राहकांना चांगला आधार मिळाला पाहिजे आणि त्यांच्यात जागृती झाली पाहिजे, यासाठी माझा हा लढा आहे, असे कदम यांनी सांगितले.
भ्रष्टाचारी संचालकांना संधी देऊ नये
By admin | Updated: April 4, 2015 00:11 IST