खड्डयांमुळे अपघाताचा धोका
खेड : भरणे येथे मध्यवर्ती ठिकाणी भुयारी मार्गाच्या उभारणीचे काम सुरू आहे. या कामामुळे दोन्ही बाजूकडील पर्यायी रस्त्यावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. या पर्यायी मार्गावर जागोजागी पडलेल्या मोठ्या खड्डयांमुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
मोबाईल टाॅवर बंद
गुहागर : तालुक्यातील कोतळूक बागकर स्टाॅप येथील भारत संचार निगमचा टाॅवर सध्या बंद असून रेंज नसल्यामुळे शोभेचे बाहुले बनला आहे. टाॅवर सुरू करण्यासाठी वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. टाॅवर सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
माेफत ओपीडी
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय व ऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटर (चिपळूण) यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सरग्रस्तांसाठी जिल्हा रुग्णालयात मोफत ओपीडीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दर बुधवारी सकाळी ११ ते २ या वेळेत मोफत ओपीडीत कॅन्सरतज्ज्ञ डाॅ. गाैरव जसवाल कर्करोग तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत.
विजेचा लपंडाव
रत्नागिरी : जिल्ह्यात चक्रीवादळामुळे वीज यंत्रणा पुरती काेलमडली होती. महावितरण कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या अथक् परिश्रमामुळे वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. मात्र तरीही अनेक गावातून विजेचा लपंडाव सुरूच असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत.