रत्नागिरी : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बाजारपेठेला आलेली मंदी गणेशोत्सवातील खरेदीमुळे काही प्रमाणात तरी दूर झाली आहे. गतवर्षीच्या गणेशोत्सवादरम्यान कोरोनाबाबतची भीती अधिक होती. यावेळी तुलनेने दुसरी लाट ओसरली असल्याने आणि कोरोनाबाबतची भीती कमी झाल्यामुळे यावेळी लोक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडले. त्यामुळे यावर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या खरेदीतून कोट्यवधींची उलाढाल झाली आहे.
जिल्ह्यात १ लाख ६६ हजार ५३९ घरगुती तर १०८ सार्वजनिक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. हा कोकणातील सर्वांत मोठा सण असल्याने नोकरीनिमित्त परगावी गेलेले लोक त्यासाठी हमखास हजेरी लावतात. यंदाही जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी तब्बल एक लाख ९१६ मुंबईकर गावी आले आहेत. यामध्ये रेल्वेद्वारे ३१,०९०, बसद्वारे २४,८५८, खासगी वाहनातून २२,२९९, खासगी आराम बसने २२,६६९ लोक आले. गतवर्षीपेक्षा अधिक लोक यावर्षी आले असून, उत्सव शांततेत परंतु आनंदात साजरा करण्यात येत आहे.
मुंबईकर मुंबईतून येताना गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करीत असले तरी स्थानिक बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. मखर सजावटीच्या वस्तू, कपडे, प्रसादासाठी लाडू, पेढे, पूजेचे साहित्य, गौरी ओवशासाठी लागणाऱ्या साहित्यांची खरेदी करण्यात आली आहे.
लाखोची उलाढाल
जिल्ह्यात अडीच ते तीन हजार मूर्तिकार असून, त्यांच्याकडून गणेशमूर्ती तयार करून घेतल्या जातात. पेण किंवा कोल्हापूर येथून जिल्ह्यात गणेशमूर्ती विक्रीला आणल्या जातात. स्थानिक मूर्तिकारांच्या मूर्तींप्रमाणेच परजिल्ह्यातून आलेल्या गणेशमूर्तींचीही खरेदी केली जाते. काही सार्वजनिक मंडळे मुंबईहून गणेशमूर्ती घेऊन येतात. जिल्ह्यातील काही मंडळी व्यवसाय अथवा नोकरीमुळे परजिल्ह्यात किंवा राज्यात नोकरीला आहेत. त्यामुळे नातेवाइकांमार्फत येथून गणेशमूर्ती विकत घेऊन नेली जाते. इंधनवाढ, महागाईचा परिणाम मूर्ती व्यवसायावर झाल्याने दरात १० ते १५ टक्केने वाढ झाली होती. संपूर्ण जिल्ह्यात मूर्ती व्यवसायामुळे सुमारे तीन ते साडेतीन कोटींच्या घरात उलाढाल झाली आहे.
सजावट साहित्य खरेदी
गणेशमूर्तीबरोबरच मूर्ती ठेवण्यासाठी मखर सजावटीवरही अधिक खर्च केला जातोे. त्यासाठी लागणारे पडदे, झुंबर, विद्युत माळा, फुलांच्या माळांची खरेदी करण्यात येते. सजावट साहित्य खरेदीसाठी गतवर्षीच्या तुलनेत चांगला प्रतिसाद लाभला. वर्षाचा सण असल्याने कपडे खरेदी प्राधान्याने केली जाते. फिजिकल डिस्टन्सिंगमुळे उत्सवच साधेपणाने साजरा होत असतानाही बाजारात विविध वस्तूंची खरेदी ग्राहकांनी केली.
मिठाई व्यवसाय तेजीत
गणेशोत्सवात सहस्त्रनामाचे आयोजन करण्यात येते. त्यावेळी सहस्त्र लाडू, मोदक अर्पण केले जातात. मोठा मोदक किंवा मोठा लाडू ठेवला जातो. पूर्वी मुंबईतून मोठे लाडू आणले जात असत. परंतु आता रत्नागिरीतही पाव किलोपासून एक किलोपर्यंतचे लाडू उपलब्ध असल्याने मोतीचुराच्या लाडवांसह तिरंगी मोदक, काजू मोदक, ड्रायफ्रूट मोदक तसेच विविध प्रकारचे पेढे, मोदक तसेच अन्य मिठाईला विशेष मागणी होती.
मोदकांना मोठी मागणी
उत्सवात पाहुण्याची वर्दळ असल्याने लाडू, चिवडा, फरसाण यांचाही खप बऱ्यापैकी होता. त्यातच यावर्षी ओवसे असल्याने फराळाचे तयार जिन्नसांना तर विशेष मागणी होती. त्यामुळे मिठाई व्यवसायातूनही लाखोची उलाढाल झाली. याशिवाय मिठाई विक्रेत्यांनी तयार उकडीचे मोदक मोदकांसाठी खास ऑर्डर घेतली होती.
फुलांचा खप
ताज्या फुलांचा वापर सजावटीबरोबर पूजेसाठी केला जातो. त्यामुळे हार, सुटी फुले, गणपतीसाठी किरीट, मुकुट, बाजूबंद, कमरपट्टा यांना विशेष मागणी होती. वेण्या, गजरे यांचाही खप मोठ्या प्रमाणावर होतो. याशिवाय दुर्वांच्या जुड्या, दुर्वा हार, झेंडू, गुलाब, शेवंती, जर्बेरा तसेच सजावटीसाठी डेलियाला विशेष मागणी होती. कोल्हापूर, वाशी, मुंबईतून फुलांची आवक वाढली होती. झेंडू १०० ते १२० रुपये, गुलछडी ३००, गुलाब १२० ते २००, शेवंती २५० ते ३०० रुपये किलो दराने विक्री सुरू होती. फुलांनाही चांगली मागणी असल्याने व्यवसाय तेजीत होता.