गुहागर : तालुक्यातील वरवेली, रांजाणेवाडी येथील विकासकामांसंदर्भात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा मृणाल विचारे यांच्या पुढाकाराने गुहागर तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी वरवेली गाव भेट दौरा केला.
चाकरमानी परतीकडे
लांजा : गणेशोत्सवाची सांगता होऊ लागल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील चाकरमानी आता हळूहळू कामाच्या ठिकाणी परतू लागले आहेत. कोकण रेल्वेचे आरक्षण फुल्ल झाल्याने काही जणांना आता एसटी बस तसेच खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. सध्या रेल्वे स्थानक, बस स्थानक आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसू लागली आहे.
जादा बसेस
खेड : खेड आगार प्रशासनाने गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भक्तांसाठी जादा बसेस सोडल्या आहेत. त्यामुळे चाकरमानी बहुसंख्येने तालुक्यात दाखल झाले आहेत. जादा बसेसची संख्या वाढल्याने जागेअभावी या बसेस सद्य:स्थितीत गोळीबार मैदानावर उभ्या करण्यात आल्या आहेत. चाकरमानी आता हळूहळू परतीच्या प्रवासाला लागले आहेत.
गोवर्धन पर्वताचा देखावा
रत्नागिरी : तालुक्यातील सोमेश्वर गुरववाडी येथील मयूर भितळे या तरुणाने गणेशोत्सवात गोवर्धन पर्वताचा देखावा साकारला आहे. गृहोपयोगी वस्तूंचा वापर केल्याने तो अधिक लक्षवेधी ठरला आहे. गोवर्धन पर्वत करंगळीवर पेलणाऱ्या कृष्णाचा हा देखावा भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.
जनावरांची चोरटी वाहतूक
शिरगाव : कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणाऱ्या कुंभार्ली घाटातून जनावरांची चोरटी वाहतूक होत आहे. मात्र पोलिसांच्या आशीर्वादाने याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. कुंभार्ली घाटमाथ्यावर चेकपोस्ट असून या ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येते. मात्र तरीही जनावरांच्या या अवैध वाहतुकीकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.