रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोरदार धडका सुरु झालेला असतानाच विकासकामांसह गद्दारी या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस जनतेसमोर जाणार आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये या मुद्द्यावरुन जोरदार राडा होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे. सत्तेसाठी वाटेल ते करता येते, असे एकूण आजच्या राजकीय स्थितीवरुन दिसून येते. कारण जनतेच्या भल्यापेक्षा स्वत:ची पोळी कशी भाजता येईल, असेच जिल्ह्यातील राजकीय उलाढालीवरुन स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता मतदार जागा होणार का, अशी चर्चा सुरु आहे. रत्नागिरी पंचायत समितीवर शिवसेना-भाजपा युतीचे राज्य असतानाही आमदार राष्ट्रवादीचा होता, यातून खरे राजकारण कळत होते. उदय सामंत यांनी केलेल्या शिवसेनेतील प्रवेशाने राष्ट्रवादी एकदम पोरकी झाल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे तालुक्यात भरकटलेले तारु कसे तारता येईल, यासाठी बशीर मुर्तुझा यांच्या हाती दोर देण्यात आला आहे. विविध खात्यांचे मंत्री असलेल्या पालकमंत्र्यांनी आघाडी शासनाच्या माध्यमातून विकासकामे केली. त्याचे श्रेय सामंत हेच घेणार असल्याचा प्रश्न राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सतावत आहे. राष्ट्रवादीने सामंत यांना काय नाही दिले, तरीही त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करुन आपली पुढील राजकीय कारकीर्द सुरु केली आहे. त्यामुळे अचानक राष्ट्रवादी एकदम रिकामी झाल्याने उर्वरित पदाधिकाऱ्यांनीही गप्प बसून चालणार नाही, असाच काहीसा विचार पुढे येत आहे. त्यामुळे आघाडी सरकारने केलेली विकासकामे, हा मुद्दा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस जनतेसमोर जाणार आहेच. शिवाय ज्याला पक्षाने युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद आणि मंत्रिपद देऊन राज्याच्या राजकारणात सक्रिय केले. त्यानेच पक्षाशी गद्दारी केली. आता विकासकामांबरोबर गद्दारी हा मुद्दा घेऊन जनतेसमोर जाण्यातच राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना रस आहे. त्यामुळे गद्दार या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचा प्रचार शिगेला पोहोचणार आहे. गद्दार या मुद्द्याला सामंत आणि शिवसेना कशा प्रकारे उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, गद्दारीवरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये राडा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामंत यांच्या मुद्द्यावरुन रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील वातावरण तापणार आहे. या मतदार संघातील लढतीकडे जिल्ह्यातील सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. (शहर वार्ताहर)
विकासकामांसह गद्दारीचा मुद्दा रंगणार
By admin | Updated: September 29, 2014 00:12 IST