चिपळूण : तालुक्यातील पिंपळी बुद्रुक महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रफीक देवळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. देवळेकर यांचा सामाजिक कार्यात नेहमी सहभाग असतो. गावाच्या विकासासाठी ते नानाविध उपक्रम राबवित असतात. त्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे.
शैक्षणिक साहित्य वाटप
चिपळूण : कै.डॉ.राजाराम सीताराम जगताप यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त शहरातील गोवळकोट येथील जिल्हा परिषद मराठी शाळा आणि बालवाडीतील विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके आणि अन्य शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी श्री देवी करंजेश्वरी देवस्थानचे अध्यक्ष ॲड.प्रसाद चिपळूणकर यांनी आठवणींना उजाळा दिला.
विद्यालयाला देणगी
रत्नागिरी : येथील केशव परशुराम अभ्यंकर मुकबधिर विद्यालयाला अनुराधा बने यांनी कन्या प्रिया बने हिच्या स्मरणार्थ २ लाख ५० हजारांची देणगी दिली आहे. ही देणगी बँकेत ठेऊन प्रतिवर्षी येणाऱ्या व्याजातून विद्यालयातील विविध उपक्रम साजरे करण्याची अपेक्षा अनुराधा बने यांनी यावेळी व्यक्त केली.
कोळंबी संवर्धन प्रशिक्षण
रत्नागिरी : नजीकच्या मत्स्य महाविद्यालयात २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धन या विषयावर अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हे प्रशिक्षण नि:शुल्क असून, प्रशिक्षणार्थींची निवड महाराष्ट्रातील प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचे लाभधारक संभाव्य कोळंबी संवर्धन यांच्यातून प्राधान्याने करण्यात येणार आहे.
सामाजिक बांधिलकी
मंडणगड : पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले होते. या वर्षी मंडळाने कोरोनाच्या काळात वाढत्या रक्ताची गरज लक्षात घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी ३७ दात्यांनी रक्तदान केले.