रत्नागिरी : शिक्षक भरतीसाठी टीईटी सक्तीची करण्यात आली आहे. मात्र, या परीक्षेचा निकाल अवघा एक ते दोन टक्के लागत आहे. शिवाय गेली दहा वर्षे शिक्षक भरती रखडली आहे. दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी लाखो रूपये खर्च करून अनेकांना नोकरी नसल्याने युवकांनी डी. एड.साठी प्रवेश घेणे बंद केले आहे. जिल्ह्यातील चार डी.एड महाविद्यालयात २४० प्रवेश क्षमता असताना अवघे ७८ अर्ज आले असून, अन्य विद्यार्थ्यांनी आता स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रम राज्यभरात सुरू आहे. सुरूवातीला डीएड (डिप्लोमा इन एज्युकेशन) नंतर डीटीएड (डिप्लोमा इन टिचर एज्युकेशन) सध्या डीएलएड (डिप्लोमा इन इलिमेंटरी एज्युकेशन) या नावाने अभ्यासक्रम सुरू आहे. हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शिक्षक नोकरीची हमखास संधी होती. त्यामुळे डीएड विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत असे. मात्र, सध्या शिक्षक भरतीच बंद असल्याने लाखो विद्यार्थी डी.एड वा बी.एड होऊन नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातही नोकरीसाठी सीईटी, टीईटीसारख्या परीक्षांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, तरीही शिक्षक भरतीबाबत अनिश्चितता आहे. २०११ नंतर २०१७ ला पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करण्यात आली. मात्र, त्यावेळी निम्मी भरती झाली नाही. त्यामुळे अनेकांचा हिरमाेड झाला. आता डी.एड ऐवजी बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली आहे.
---------------------
सन २०१० नंतर २०१७ साली शिक्षक भरतीचे नियोजन करण्यात आले. मात्र ही प्रक्रिया आजमितीस लांबलेली आहे. पवित्र पोर्टलचा जो गाजावाजा करण्यात आला त्यातील भोंगळ कारभार दुनियेसमोर आला आहे. बारा हजार पदे भरण्याची घोषणा करून देखील अवघी तीन ते चार हजार पदे प्रत्यक्ष भरली आहेत. एखादी भरती दोन वर्षापेक्षा अधिक लांबविणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळण्यासारखे आहे.- प्रभाकर धोपट, खंडाळा-रत्नागिरी
--------------------
शिक्षक भरती आज करू, उद्या करू असे करता करता शासनाने दहा वर्षे आश्वासनावर ढकलली आहेत. दहा वर्षांतील तरूणाई शिक्षण घेऊन बरबाद झाली आहे. बदललेली धोरणे आणि भरती करण्याबाबत उदासीनता, भरतीबाबतचे निर्णय याचा फटका बसत आहे. त्यामुळे शिक्षक भरतीवरचा विश्वासच उडाला आहे. स्पर्धा परीक्षेनंतर नोकरीची हमी असल्याने त्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
- कल्पेश घवाळी, रत्नागिरी