रत्नागिरी : ग्रामीण भागातील महिलांसाठी २० लाख रुपये खर्चून वाटप करण्यात आलेल्या १२० पल्वलायझर मशिन्स निकृष्ट दर्जाची निघाल्या. त्यामुळे अनेक लाभार्थींकडून या मशिन्स जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागाला परत करण्यात आल्या आहेत.महिलांनी घरच्या घरी स्वयंरोजगार सुरु करुन संसाराचा गाडा हाकण्यासाठी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून ग्रामीण भागातील त्या महिलांचे सक्षमीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी विविध योजना राबवून त्यांना उत्पन्नाचे साधन कसे उपलब्ध होईल, यासाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न सुरु आहेत. जिल्हा परिषद सेस फंडातून महिला सक्षमीकरणासाठी २० लाख रुपये खर्चून पल्वलायझर मशिन्स वाटप करण्याचा निर्णय महिला व बालकल्याण समितीने घेतला होता. त्याप्रमाणे ग्रामीण भागातून गरजू व गरीब महिलांकडून प्रस्ताव मागवण्यात आले होते. हे पल्वलायझर २० हजार रुपये किमतीचे असल्याने त्यासाठी १० टक्के रक्कम लाभार्थींनी भरायची होती. त्याप्रमाणे लाभार्थींकडून २००० रुपये भरण्यात आले. उर्वरित १८ हजार रुपये रक्कम सेसफंडातून देण्यात आली. जिल्हाभरातून या पल्वलायझर मशिन्ससाठी १२० लाभार्थींनी महिला व बालकल्याण विभागाकडून मागणी केली. त्याप्रमाणे या लाभार्थींनी प्रस्ताव सादर केले. शासनाने सूचवलेल्या कंपनीकडून या मशिन घेणे आवश्यक होते. त्याप्रमाणे महिला व बालकल्याण विभागाने श्री व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीज, नागपूर यांच्याकडून या मशिन्स खरेदी केल्या. एका मशिनची किंमत २० हजार ८० रुपयेप्रमाणे ती खरेदी करण्यात आली. त्यानंतर ग्रामीण भागातील १२० लाभार्थींना वाटप करण्यात आली होती.या मशिनवर घरातच गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी यांच्या दळणासह मिरचीपूड दळण्याची कामे करुन स्वयंरोजगार करण्यास या लाभार्थींनी सुरुवात केली. मात्र, पीठ व्यवस्थित येत नव्हते. एक नव्हे तर सर्वच लाभार्थींना एकसारखाचा अनुभव आल्याने कंपनीकडून लाभार्थींना निकृष्ठ दर्जाचे मशिन देण्यात आल्याचे लक्षात आले. त्यानंतर जिल्ह्यातील सर्वच लाभार्थ्यांची ओरड सुरु झाली. याबाबत अनेकांनी महिला व बालकल्याण विभागाकडे तक्रारीही केल्या. त्या मशिन्स परत करण्यात आल्या. निकृष्ट मशिन्स वाटप करण्यात आल्याचे लक्षात येताच महिला व बालकल्याण विभाग अडचणीत आला आहे. त्यामुळे आता ही मशिन्स बदलण्यासाठी कंपनीच्या पुरवठादाराकडे महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली आहे. त्यानंतर महिला व बालकल्याण सभापती स्मिता धामणस्कर यांनी पुरवठादारासमोर बोलावून त्याची चांगलीच कानउघाडणी केली. (शहर वार्ताहर)
जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती स्मिता धामणस्कर यांनी तत्काळ पल्वलायझर कंपनीच्या पुरवठादाराला बोलावून प्रात्यक्षिक करुन घेतले. मात्र, या पल्वलायझरमधून मिरचीपूडही व्यवस्थित येत नव्हती. त्यामुळे संतप्त झालेल्या सभापतींनी तत्काळ मशिन्स बदलून देण्याची सूचना त्या पुरवठादाराला दिली आहे.