चिपळूण : पेट्रोल, डिझेल दरवाढीसह महागाईचा भडका उडाला असल्याने त्याविरोधात येथील शहर काँग्रेसने सोमवारी जोरदार निदर्शने केली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनसंदर्भात दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी व जमावबंदी असताना गर्दी केल्याने या आंदोलनात सहभागी झालेल्या १२ जणांवर येथील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये दोन काँग्रेस नगरसेविकांचाही समावेश आहे.
नगरसेवक करामत मिठागरी, नगरसेविका सका गोठे, राकेश दाते, आलम अली, बच्चू कांबळी, सचिन गायकवाड, साजिद सरगुरोह, उजेर घारे, नाईफ तांबे, अश्विनी भुस्कुटे, श्रद्धा कदम, निर्मला जाधव (सर्व चिपळूण) आदी जणांवर गुन्हा दाखल केला आहे. शहर काँग्रेसतर्फे सोमवारी कोरोना लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून महामार्गावरील मेहता पेट्रोल पंपासमोर त्यांनी निदर्शने केली. गेल्या ७ वर्षांत मोदी सरकारच्या काळात झालेली इंधन दरवाढ आणि त्यापूर्वीचे दर असे तुलनात्मक फलक हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. यावेळी पेट्रोल डिझेल भरण्यासाठी आलेल्या वाहनधारकांनीही काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे समर्थन केले. मात्र, लाॅकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस नाईक प्रकाश गुजर यांनी दिली.
-------------------------------
पेट्रोलचे दर शंभरी पार गेले आहेत. डिझेलनेही ९० पार केले आहे. या दरवाढीचा परिणाम प्रत्येक क्षेत्रात आता जाणवू लागला आहे. महागाईचा जणू भडकाच उडाला आहे. कोरोना महामारीत लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य आर्थिक संकटात सापडले असून या महागाईमुळे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. त्याविरोधात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उठवलेला आवाज चुकीचा नाही. तेव्हा जनतेच्या भल्यासाठी एक नव्हे अनेक गुन्हे दाखल झाले तरी चालतील. न्याय मिळाला नाही, तर ही चूक आम्ही पुन्हा पुन्हा करू.
- लियाकत शाह, शहराध्यक्ष काँग्रेस, चिपळूण