पावस : रत्नागिरी तालुक्यातील पावस नालेवठार येथे बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षाची गाय ठार झाल्याचा प्रकार मंगळवारी घडला असून, बुधवारी सकाळी ते लक्षात आले.
नालेवठार येथील सुभाष सखाराम शिंदे यांची गुरे बागेमध्ये नेहमीप्रमाणे चरायला गेली होती. मंगळवार ३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी जेव्हा शिंदे गुरांना गोठ्यात बांधायला गेले तेव्हा एक गाय परत आली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी गोठ्याच्या शेजारी बागेत फिरून पाहिले. पण गाय सापडली नाही.
दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सकाळी ११ वाजता जेव्हा त्यांनी बागेत पुन्हा शोध घेतला, तेव्हा त्यांना त्यांची गाय मृतावस्थेत सापडली. आढळून आली. या प्रकाराची माहिती त्यांनी लगेचच पावसचे पोलीस पाटील अशोक नैकर यांना दिली. पाेलीस पाटलांनी ही घटना लगेचच वन विभागाला कळवली. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत वनविभागाकडून कोणीही पाहणी करण्यासाठी आले नव्हते.
याआधी दोन दिवसांपूर्वी याच भागात स्वामी स्वरुपानंद सेवा मंडळाच्या गोशाळेतील पाच वर्षांची गायी बिबट्याने ठार केली होती. तीन दिवसात दुसरा हल्ला झाल्याने परिसरात बिबट्याची दहशत परत निर्माण झाली आहे. यामुळे बागेत कामाला जाणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.