चिपळूण : साडे तेरा वर्ष काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून रमेश कीर यांनी काम केले. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता आजपर्यंत त्यांनी केवळ वरिष्ठ नेत्यांची मर्जी सांभाळण्यावर अधिक भर दिला आहे. काँगे्रसला जिल्ह्यात आलेले अपयशाची नैतिक जबाबदारी त्यांनी समजून या पदाचा राजीनामा द्यावा. अन्यथा त्यांना या पदावरुन दूर करण्यासाठी दि. ९ जून रोजी काँग्रेस भवन रत्नागिरी येथे सकाळी १० वाजता ज्येष्ठ कार्यकर्ते उपोषणास बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. चिपळूण शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आज सोमवार जिल्ह्यातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत हा ठराव करण्यात आला. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष अॅड. सुजित झिमण, माजी नगराध्यक्ष रवींद्र सुर्वे, पुनर्वसन समिती सदस्य अशोक जाधव, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी कदम, अॅड. बाळ बेलोसे, विजय भोसले, बाळ शेट्ये, इब्राहिम दलवाई, उस्मान बांगी, प्रकाश साळवी, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. गांगण, बाबाजी खांबे, संजय गांधी निराधार योजनेचे चिपळूण तालुकाध्यक्ष सुरेश राऊत आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
कीर यांना हटवण्यासाठी काँग्रेसचा गट पुढे
By admin | Updated: May 27, 2014 01:03 IST