रत्नागिरी : सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, पोलीस खात्यावर त्यांचा विश्वास बसायला हवा याकरिता रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी अत्यंत महत्वाचा उपक्रम सुरु केला आहे. पोलीस स्थानकावर डॉ. शिंदे यांनी विशेष लक्ष केंद्रीत केल्याने तक्रारदारांना पोलीस ठाण्यात सन्मानाची वागणूक मिळू लागली आहे.पोलीस अधीक्षक कार्यालयातील सुविधा केंद्रामध्ये दररोज जिल्ह्यात अत्यंत गंभीर गुन्ह्यांबाबत किती तक्रारी नोंद झाल्या त्याचा तपशील येतो आणि त्यामध्ये फिर्यादीचा मोबाईल क्रमांक, नाव आदी तपशील सुद्धा येतो. त्या फिर्यादीनंतर दुसऱ्या दिवशी नागरी सुविधा केंद्रातून संबंधित तक्रारदाराला फोन करुन तुमची तक्रार नोंदवून घेतली का? तेथे पोलीस स्थानकात तुम्हाला वागणूक योग्य मिळाली का? तक्रारीची प्रत किंवा अदखलपात्र गुन्हा दाखल केला असेल तर त्याची प्रत दिली का? अशी विचारणा केली जाते आणि त्यामध्ये कुणाला काही तक्रार घेण्यात आडकाठी किंवा दुरुत्तर केले असेल तर त्या तक्रारदाराशी पोलीस अधीक्षक बोलतात. त्यांचेकडून सारी वस्तुस्थिती विचारुन घेतात आणि जर काही अयोग्य वाटले तर त्याप्रमाणे संबंधितावर कारवाई करण्याची भूमिका घेतली जाते.त्यामुळे आता पोलीस अधीक्षकांची आपल्यावर नजर असल्याची जाणीव प्रत्येक पोलीस स्थानकात झाल्याने आता तक्रारदाराची तक्रार घेताना त्याला योग्य वागणूक दिली जात आहे. पोलिसांबद्दल सामान्य माणसाला सहानुभूती निर्माण होत असून, पोलीस आणि जनतेत एकमेकांबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. (वार्ताहर)
तक्रारदारांना आता सन्मानाची वागणूक
By admin | Updated: September 21, 2015 23:44 IST