खेड : गणपती बाप्पा मोरया, या पुढच्या वर्षी लवकर या नामघोषात मंगळवारी पाच दिवसांच्या गौरी - गणपतीचे विर्सजन खेडमधील जगबुडी व नारंगी नदीच्या विर्सजन घाटावर मोठ्या उत्साहात पार पडले.
खेडमधील १०,५८० गणेशमूर्तीचे व ५,५५० गौरीचे विसर्जन येथील जगबुडी व नारंगी नदीच्या विर्सजन घाटावर जल्लोषी वातावरणात झाले. यावेळी शहरातील मुरलीमनोहर गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीसह आणखी पाच सार्वजनिक गणपतींचे विर्सजनही करण्यात आले. दोन्ही नद्यांच्या विर्सजन घाटावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. हा सोहळा शांततेच्या वातावरणात व शिस्तबद्द रितीने पार पडला.
सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरूच होती. त्यामुळे गणेशभक्तांना आपल्या लाडक्या गणरायाला विर्सजन घाटावर घेऊन जाताना फारच कसरत करावी लागली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खेड पोलिसांनी गर्दीच्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला होता.