राजापूर : नागरिकांच्या विराेधानंतरही मुंबई-गोवा महामार्गावरीलरत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सीमेवरील हातिवले (ता. राजापूर) येथील टोलनाका मंगळवार (११ एप्रिल)पासून सुरू करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने या टाेलवसुलीला परवानगी दिल्याने सकाळपासूनच टाेल वसुलीला सुरूवात झाली. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि सुट्टीसाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.हातिवले टोलनाक्यावर वसुलीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. याठिकाणी सिग्नल यंत्रणाही बसवण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी आणि स्थानिकांनी विरोध करत टोलनाका सुरू करण्याचा प्रयत्न हाणून पडला होता. महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलवसुली करून देणार नाही, अशी भूमिका सर्वपक्षीय राजकीय नेते व नागरिकांनी घेतली होती. त्यानंतर टाेलवसुलीचा प्रश्न काहीसा मागे पडला हाेता. मात्र, मंगळवारी अचानक हातिवेले येथील टाेलनाक्यावर टोलवसुली सुरु करण्यात आली आहे.केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा केला हाेता. यावेळी त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणीही केली हाेती. त्यानंतर झालेल्या बैठकीत मंत्री गडकरी यांनी टोल सुरू करण्यासंदर्भात निर्देश दिले हाेते. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने आम्हाला टोल सुरू करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यानुसारच आम्ही टोल वसुलीला सुरुवात केलेली आहे, अशी माहिती टोल कंत्राटदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नागरिकांच्या विरोधानंतरही राजापुरातील हातिवले टोलनाक्यावर वसुली सुरू, चाकरमान्यांच्या खिशाला कात्री लागणार
By अरुण आडिवरेकर | Updated: April 11, 2023 16:53 IST