लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : मुंबई - गोवा महामार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या चिपळूण बहादूरशेख नाका येथील वाशिष्ठी पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. काॅंक्रीटीकरणाच्या शेवटच्या थराचे (वेरिंग कोट) काम अजून शिल्लक असून, त्याची तयारी पूर्ण झाली आहे. तसेच जोडरस्त्याचेही काम शिल्लक आहे. हे काम सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण झाले तर पूल वाहतुकीच्या दृष्टीने चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी खुला होण्याची शक्यता आहे.
चिपळूणच्या वाशिष्ठी नदीवर बांधलेला ब्रिटिशकालीन पूल जीर्ण होऊन धोकादायक बनला आहे. जड वाहनांची वाहतूक झाल्याने हा पूल चक्क हलत होता. त्यामुळे अतिवृष्टीमध्ये पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येत होता. तसेच नुकत्याच आलेल्या महापुराच्या वेळी पुलाचा काही भाग खचला आणि वाहतूक ठप्प पडली होती. अखेर मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत नवीन पुलाच्या कामाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुळात मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम केंद्र सरकारने हाती घेतले, तेव्हा त्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणून सर्वप्रथम महामार्गावरील पुलांना मंजुरी देण्यात आली. त्यावेळी सर्वात प्रथम चिपळूण वाशिष्ठी पुलाचे काम सुरू करण्यात आले. चिपळूण परशुराम ते आरवली खेरशेत या ३३ किलोमीटर अंतरातील चौपदरीकरणाच्या टप्प्यात पुलाचा समावेश असल्याने पुलासाठी स्वतंत्र असा निधी दिलेला नाही.
या पुलाचे काम घेतलेल्या पहिल्या ठेकेदाराने काही अडचणीमुळे काम अर्धवट सोडले. त्यानंतर चौपदरीकरण करणाऱ्या चेतक इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडे पुलाचे काम वर्ग करण्यात आले. उर्वरित कामाला चेतक कंपनीने सुरुवात केली. परंतु, कोरोना लॉकडाऊन आणि कामगारांची कमतरता यामुळे चेतक कंपनी अडचणीत आली आणि महामार्गाच्या कामासह पुलाचे कामदेखील त्या कंपनीने सोडून दिले. साहजिकच वाशिष्ठी पुलाचे काम ठप्प पडले. त्यानंतर आलेल्या रिगल इन्फ्रा कंपनीने हे काम हाती घेतले आणि कामाला गती मिळाली. खासदार विनायक राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सतत पाठपुरावा करून पुलाचे काम सलग २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याला यशदेखील आले.
-------------------------
आता वाशिष्ठी पुलाचे मूळ काम पूर्ण झाले आहे. पुलावरील अंतिम टप्प्यातील काॅंक्रीटीकरण (वेरिंग कोट) चार दिवसांत देण्यात येणार आहे. तसेच जोडरस्त्याचे डांबरीकरण येत्या ८ दिवसात पूर्ण करून पूल एकेरी वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.
- आर. आर. मराठे, शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, चिपळूण.
----------------------------
चाकरमान्यांचा परतीचा प्रवास होणार सुखकर
कोकणातील गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणासाठी लाखो गणेशभक्त चाकरमानी कोकणात येतात. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी पुलाचे लोकार्पण करण्याची तयारी सुरू केली आहे. परंतु सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे काम पूर्णत्त्वास गेले तरी लोकार्पणासाठी कालावधी लागल्यास या पुलावरून चाकरमान्यांचे आगमन शक्य नाही. पण, परतीचा प्रवास सुखकर होण्याची शक्यता आहे.
--------------------
पुलाची एकूण लांबी २४७.५ मीटर
रुंदी २४ मीटर
१२ मीटर रुंदीचे दोन पूल
७ पिलर
पिलरची उंची १४.३०० मीटर