मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील चोळई गावाच्या हद्दीत डिझायर कार आणि मिनीबस ट्रॅव्हलर यांची समोरासमोर धडक बसून दाेन्ही वाहनांचे नुकसान झाले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
खेड : भरधाव डिझायर कार आणि ट्रॅव्हलर या दोन वाहनांची समोरासमोर जोरदार टक्कर होऊन झालेल्या अपघातात डिझायर कारमधील चार प्रवाशांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्याची घटना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कशेडी घाटाच्या सुरुवातीलाच असलेल्या चोळई गावाच्या हद्दीत घडली. या अपघातातील जखमींना महाड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रत्नागिरीतील ट्रॅव्हलर मिनीबस (एमएच १२, क्यूजी ५१२०) मुंबईकडे आणि डिझायर (एमएच ०८, आर ७०८०) ही मुंबईकडून रत्नागिरीकडे निघाली हाेती. पोलादपूर तालुक्यातील चोळई गावातील सायली ढाब्याच्या हद्दीत समोरासमोर जोरदार टक्कर झाली. या अपघातात मिनीबस चक्क बॉक्स कटिंगच्या मातीच्या उंचवट्यावर धडकली, तर डिझायर कारला जोरदार धडक बसल्याने दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. यावेळी कारमधील जखमींना तातडीने बाहेर काढण्याकामी चोळईतील स्थानिक तरुण, तसेच नूरी पालोजी यांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्याबाहेर काढण्याकामी तातडीने सहकार्य केले.
यामध्ये डिझायर कारमधील प्रणय प्रवीण चव्हाण (वय २९), प्रवीण विनायक चव्हाण(वय ४९), दीक्षा देवेंद्र किर (वय २८) आणि पूजा प्रवीण चव्हाण (वय ४८) हे चौघे जखमी झाले. चारही जखमींना महाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक संदीप शिरगांवकर यांनी डिझायर कारचा चालक प्रणय प्रवीण चव्हाण याने रस्त्याची परिस्थिती न बघता बेदरकारपणे कार चालवून स्वतसह इतरांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.