रत्नागिरी : सन १९९७पासून आजपर्यंत ५ नवीन संगीत नाटके व ६ जुन्या संगीत नाटकांची यशस्वी निर्मिती करणाऱ्या रत्नागिरीच्या सांस्कृतिक क्षेत्रात गेली १९ वर्षे सातत्यपूर्ण कार्य करणाऱ्या खल्वायन संस्थेतर्फे संगीत संशयकल्लोळ या नाटकाचा शताब्दीपूर्ती सोहळा रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा २० आॅक्टोबरला सायंकाळी ६ ते १० या वेळेत स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात होणार आहे. २० आॅक्टोबर १९१६ रोजी सं. संशयकल्लोळ नाटकाचा प्रयोग गंधर्व नाटक मंडळींनी हुबळी-कर्नाटक येथे सादर केला. या पहिल्या प्रयोगात नटश्रेष्ठ गणपतराव बोडस, सदुभाऊ रानडे, दत्तोबा पेटकर, मास्टर कृष्णराव व रेवतीच्या भूमिकेत साक्षात बालगंधर्व असा नटसंच होता. बरोबर १०० वर्षांनी हे नाटक तितक्याच ताकदीने २० आॅक्टोबरला खल्वायन संस्थेचे कलाकार रत्नागिरी शहरातील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात सादर करणार आहेत. पहिल्या प्रयोगात सत्यनारायणाच्या प्रवेशात संगीत जलसा हा प्रसंग घेतला होता. या १००व्या नाटकाच्या वाढदिवसाप्रसंगी होणाऱ्या प्रयोगातसुद्धा हा जलशाचा खास प्रसंग घेतला जाणार आहे. या शताब्दीपूर्ती सोहळ्याला संगीत रंगभूमीवरील प्रदीर्घ काळ कार्यरत असलेले अरविंद पिळगावकर, जयंत सावरकर, मेधा गोगटे - जोगळेकर, भारती गोसावी हे प्रसिद्ध व ज्येष्ठ कलाकार उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरीच्या संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलाकार अॅड. सुधाकर भावे हेही त्यांच्यासोबत असतील. आकाशवाणीच्या निवृत्त ज्येष्ठ निवेदिका निशा काळे व खल्वायनचे दिग्दर्शक प्रदीप तेंडुलकर या सर्व नट मंडळींशी वार्तालाप करणार आहेत. मनोहर जोशी यांनी दिग्दर्शन केलेल्या या नाटकात ते स्वत: मुख्य भूमिका करत आहेत. त्यांच्यासमवेत शमिका जोशी, श्वेता जोगळेकर, अजिंक्य पोंक्षे, आनंद प्रभुदेसाई, विजय जोशी, गणेश जोशी, मुक्ता जोशी, कौस्तुभ जोशी, प्राजक्ता जोशी, अर्चना जोशी, अभिजित भट, स्मिता करंदीकर हे रत्नागिरीतील कलाकार आहेत. नाटकाला संगीत मार्गदर्शन आनंद प्रभुदेसाई, नेपथ्य दादा लोगडे, सहाय्य अमित धांगडे, संजय लोगडे, किशोर नेवरेकर, सौरभ लोगडे, रंगभूषा दादा लोगडे, पार्श्वसंगीत व रंगभूषा सहाय्य रामदास मोरे, वेशभूषा श्रीनिवास जोशी, प्रकाशयोजना गोपिकांत भुवड, मंगेश लाकडे करतील. नाटकाचे सूत्रधार प्रदीप तेंडुलकर हे आहेत. आॅर्गनसाथ मधुसूदन लेले, तबलासाथ हेरंब जोगळेकर करतील. (प्रतिनिधी)
संगीत संशयकल्लोळ नाटकाची शताब्दी
By admin | Updated: October 13, 2016 23:51 IST