दापोली : तालुक्यातील पालगड येथील गणपती मंदिराच्या गणेशोत्सवाला भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात झाली आहे. सुमारे ३०० वर्षांची परंपरा आजही येथील ग्रामस्थ जपत आहेत. उत्सव सुरू झाल्यापासून सहस्त्र वर्तने व महापूजा, आरती, अभिषेक, नैवेद्य, धुपारती, मंत्रपुष्प असे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
परतीच्या गाड्या
राजापूर : गणेशभक्तांसाठी परतीच्या प्रवासाकरिता १५ सप्टेंबरपासून विजयदुर्ग व्हाया जैतापूर नाटे, आडिवरे, पावस, रत्नागिरी, बोरिवली, विरार, अर्नाळा एस.टी. बस सुरू करण्यात येत आहे. या गाडीचे ऑनलाईन आरक्षण उपलब्ध आहे. ही गाडी विजयदुर्गहून दूपारी ४ वाजता सुटणार असून जैतापूरहून सायंकाळी ५ ते ५.३० च्या दरम्याने सुटेल.
खड्डे बुजविण्याची मागणी
गुहागर : चिपळूण - गुहागर मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांसह प्रवासी हैराण झाले आहेत. गणेशोत्सवापूर्वी या रस्त्यावरचे खड्डे बुजविले जातील, असे नागरिकांना वाटत होते. मात्र, गणेशोत्सवातही संबंधित यंत्रणेला खड्डे बुजविण्यास वेळ मिळाला नाही. त्यामुळे हे खड्डे अधिकच त्रासदायक बनले आहेत.
साहित्य प्रदान
राजापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजापूर व राजापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नुकतेच ओणी प्राथमिक आरोग्य केंद्राला व्हिलचेअर व हवेची गादी प्रदान केली. डाॅ. साबळे, भूषण विचारे, संदीप पळसमकर, रुपेश पळसमकर आदी कार्यकर्त्यांकडून कोविड महामारीमध्ये रुग्णाच्या सोयीसाठी या वस्तू देण्यात आल्या.