चिपळूण : येथील पोलीस स्थानकात दोन दिवसात आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असून, यामुळे आरोपींच्या हालचालीसह अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचे लक्ष राहणार आहे. कामकाजामध्ये सुसुत्रता व गतिमानता येण्यासाठी पोलीस निरीक्षक मकेश्वर यांनी उपक्रम हाती घेतला आहे.पोलीस निरीक्षक मकेश्वर यांनी येथील पदभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या कर्तव्याची जाणूव करुन देताना तक्रार घेऊन येणाऱ्या व्यक्तीशी सौजन्याने वागण्याचे धडे दिले. कर्तव्य डोळ्यासमोर राहवे म्हणून ठाणे अंमलदारांच्या टेबलमागे फलकही लावला आहे. अधिकारी, कर्मचारी नॉर्मल व्हावेत यासाठी योगाचे धडे व आर्ट आॅफ लिव्हिंगचे मार्गदर्शन शिबिर त्यांनी घेतले. पोलीस स्थानकात येणाऱ्या तक्रारदाराला बसण्यासाठी खुर्च्याही ठेवण्यात आल्या असून काम तत्काळ व्हावे म्हणून प्रत्येकाला जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांचे काम कोणत्या पद्धतीने सुरु आहे हे केबिनमध्ये दिसावे यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कोठडीत असलेल्या आरोपींच्या हालचालींवर लक्ष राहवे. ठाणे अंमलदारांकडे येणाऱ्या व्यक्तीला कशी वागणूक दिली जाते हे समजावे म्हणून या दोन मुख्य ठिकाणांसह अन्य ठिकाणीही येत्या दोन दिवसात कॅमेरे बसवले जाणार आहेत. पोलीस स्थानकात विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे उन्हाळ्यात जरी बसण्याची व्यवस्था असली तरी पावसाळ्यात गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी परिसरात शेड उभारली जाणार आहे, याची माहिती काही दिवसापूर्वी येथील दौऱ्यावर आलेल्या जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनाही देण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक मकेश्वर म्हणाले की, पोलीस स्थानकात येणाऱ्या व्यक्ती या असहाय्य असतात. त्यामुळे त्यांच्याशी आपुलकीने वागल्यास त्यांना न्याय मिळाल्यासारखे वाटते. त्यामुळे सर्वांनीच चांगल्या पद्धतीने वागावे असा आपला हेतू असून तो सफल होण्यासाठी काही प्रयत्न केले जात आहे.सीसी टीव्ही कॅमेरे हाही त्याचाच एक भाग असून पोलीस स्थानकाच्या कारभारात सुसूत्रता व गतिमानता आणण्यासाठी काही बदल केले जाणार असल्याचे मकेश्वर यांनी यावेळी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
चिपळूणच्या पोलीस स्थानकात सीसीटीव्ही वॉच
By admin | Updated: March 25, 2015 00:45 IST