असगोली : गुहागरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्या सूचनावजा आदेशानंतर श्रृंगारतळी बाजारपेठेत कोरोना चाचण्यांना सुरुवात करण्यात आली आहे. दिवसभरात २३४ व्यापारी आणि दुकानांमधील कर्मचारी यांनी आरटीपीसीआर चाचणी करून घेतली.
गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीमध्ये मंगळवारी शांतता कमिटीची बैठक आयाेजित करण्यात आली हाेती. या बैठकीत तहसीलदार प्रतिभा वराळे, गटविकास अधिकारी डॉ. अमोल भोसले यांनी गणेशोत्सवाच्या काळात दुकाने सुरू ठेवायची असतील, तर कोरोना चाचणी करून घ्या, अशी आग्रही सूचना शृंगारतळीवरील व्यापाऱ्यांना केली होती. ही सूचना व्यापाऱ्यांनी मान्य केली. त्याप्रमाणे शृंगारतळी बाजारपेठेत बुधवारी सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्र चिखलीच्या साहाय्याने आरटीपीसीआर तपासणी केंद्र सुरू करण्यात आले. तपासणी केंद्र सुरू करताना तहसीलदार प्रतिभा वराळे, गटविकास अधिकारी डॉ. भोसले, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जांगीड उपस्थित होते.
तपासणी केंद्रावर व्यापारी आणि दुकानांमधील कर्मचाऱ्यांनी आरटीपीसीआर चाचणीसाठी रांग लावली. मंगळवारी दिवसभरात २३४ जणांनी स्वॅबचे नमुने दिले आहेत. हे तपासणी केंद्र आणखी तीन दिवस शृंगारतळीत सुरू राहणार आहे. गणेशोत्सवापूर्वी सर्वांच्या स्वॅबचे अहवाल मोबाइलवर मिळतील, अशी व्यवस्था आरोग्य विभागाने केली आहे.