शोभना कांबळे -- रत्नागिरी -अगदी स्वातंत्र्योत्तर काळापासून सुरू असलेला नालबंद व्यवसाय काही वर्षांपासून कालबाह्य झाल्याने रत्नागिरीतील वृद्ध कारागीर गेली ३५ वर्षे कष्टप्रद जीणे जगत आहे. आता त्याच्याकडे केवळ या व्यवसायाच्या आठवणी शिल्लक आहेत. शहरातील गाडीतळ येथील ६८ वर्षीय बाबासाहेब इमाम नाईक (नालबंद) आपल्या या व्यवसायासंबधी माहिती देतात. पूर्वी सर्व दळणवळण बैलगाडीच्या माध्यमातून होत असे. शहरातील लक्ष्मी चौकातून पाली, बांबर, चरवेली, घाटिवळे, लांजा आदी ठिकाणी जाण्यासाठी येथून बैलगाड्या सोडण्यात येत असत. रात्रीच्या वेळी या ठिकाणी चुली पेटत. याठिकाणी एक चौथराही होता. तिथे पाण्याची सोय केलेली असे. या भागातून बैलगाड्या सुटत त्यामुळे या भागाला गाडीतळ हे नाव पडले ते कायमचे. रात्री जेवण झाले की, गाडीवान आपल्या गाड्या घेऊन रात्रीच निघत. बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज पहाटेपर्यंत ऐकायला येत असे अशी आठवण नाईक यांनी जागी केली. त्याकाळी मातीचे रस्ते होते. बैलांना खडतर अशा मार्गावरून जावे लागत असल्याने त्यांच्या चारही पायांना लोखंडी नाल बसवण्यात येत असत. हे नाल बसवण्याचे काम बाबासाहेब नाईक यांचे वडील इमाम नाईक हे सन १९३८पासून करत होते. त्याकाळी या व्यवसायाला अतिशय बरकत होती. बाबासाहेब नाईक यांनीही पुढे शिक्षण झाल्यावर आपल्या वडिलांच्या व्यवसायास हातभार लावण्यास सुरूवात केली. फाटक प्रशालेतून जुनी अकरावी केल्यानंतर त्यांनी काही काळ नोकरी केली. मात्र, वडिलांचा व्यवसाय वाढू लागल्याने त्यांनी ही नोकरीही सोडली आणि या व्यवसायालाच वाहून घेतले. या भागात दुसरा कुणीच कारागीर नसल्याने बैलांच्या पायाला नाल बसवण्यासाठी या पिता-पुत्रांना साखरतर, पावस, कासारवेली आजुबाजूच्या अनेक गावांतून बोलावणेही होत असे. एवढेच नव्हे तर त्यांचे नाईक आडनाव बाजूला पडून ते ‘नालबंद’ झाले.मातीचे रस्ते होते, तोपर्यंत बैलांच्या पायातील नाल बराच काळ टिकायचे. पण सिमेंटचे रस्ते झाले, त्यामुळे या नालांचे आयुष्यही कमी झाले. त्यामुळे व्यवसाय अधिकच वाढला. त्यानंतर सन १९७६सालानंतर हळूहळू खासगी वाहनांची संख्या वाढली आणि बैलगाड्या रोडावल्या. सन १९७८सालानंतर तर नालबंद व्यवसायाला घरघर लागली. बाबासाहेब नाईक यांच्या कुटुंबांची गुजराण कशीबशी होऊ लागली. दरम्यानच्या काळात त्यांच्या वडिलांचेही निधन झाले. त्यानंतरही नाईक कुटुंब गाडीतळावरील त्याच भाड्याच्या घरात अजूनही रहात आहे. आज या कुटुंबाला अतिशय खडतर परिस्थितीमध्ये जीवन कंठावे लागत आहे. बाबासाहेब नाईक यांना आता मधुमेहामुळे पायदुखीचा त्रास होत असल्याने त्यांना बाहेर पडणेही कठीण झाले आहे. रहात्या जागेत शौचालयासह अनेक मुलभूत गोष्टींची गैरसोय आहे. तरीही संसाराचा गाडा कसाबसा सुरू आहे. आपल्या कष्टाळू दोन्ही मुलींना चांगली नोकरी लागली की हे दिवस सरतील, असा विश्वास त्यांना वाटतोय.बाबासाहेब नाईक यांना दोन मुली आहेत. मोठी मुलगी सना हिने शिकवणी घेत अगदी वकीलीचे शिक्षण घेतले आहे. मात्र, अजुनही तिला कुठे नोकरी नाही. मात्र, विद्यार्थ्यांच्या शिकवण्या घेत ती अजुनही कुटुंबाचा गाडा चालवत आहे. तिच्यापाठची बहीण हिना हिने डीएड केले असून ती एका शाळेवर तात्पुरती शिक्षिका म्हणुन काम करीत आहे. काळाच्या ओघात आता मासे, लाकडे तसेच इतर वस्तुंची वाहतूक करणाऱ्या बैलगाड्या आता काळाआड गेल्या आहेत. नव्या पिढीला या जुन्या दळणवळणाच्या साधनाची ओळख होण्यासाठी आता ‘मामाचा गाव’ यासारख्या प्रकल्पांची निर्मिती करावी लागत आहे. रत्नागिरीत मांडवी येथेच फक्त दोन बैलगाड्या असल्याची माहिती बाबासाहेब नाईक देतात.
व्यवसाय कालबाह्य, ‘नालबंद’ कारागिराचे कष्टप्रद जीणे
By admin | Updated: October 8, 2015 00:32 IST