रत्नागिरी : ब्राउन हेराॅईन हा अमली पदार्थ विक्रीसाठी आणलेल्या दाेघांना रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुरुवारी गस्तीदरम्यान अटक केली. त्यांच्याकडून तब्बल ९० हजार ५०० रुपयांचे ११ ग्रॅम ब्राउन हेराॅईन जप्त करण्यात आले. ही कारवाई रत्नागिरी शहरातील राजीवडा ते कर्ला रस्त्यावरील बुड्ये माेहल्ला येथे करण्यात आली.मुस्तकीम युसुफ मुल्ला आणि माेहसीन नूरमाेहम्मद फणसाेपकर (दाेघेही रा. राजीवडा, रत्नागिरी) अशी अटक केलेल्या दाेघांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पाेलिस अधिकारी व अंमलदार गुरुवारी शहरात गस्त घालत असताना त्यांना गाेपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पाेलिसांनी राजीवडा ते कर्ला या रस्त्यावर पाळत ठेवली हाेती. त्यावेळी दाेन व्यक्ती हातात पिशवी घेऊन संशयित हालचाली करताना दिसले. त्यांची चाैकशी केली असता, त्यांच्याकडे ब्राउन हेराॅईनच्या १७५ पुड्या सापडल्या. याप्रकरणी दाेघांवर रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.ही कामगिरी पाेलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह श्रेणी पाेलिस उपनिरीक्षक संदीप ओगले, सहायक फाैजदार सुभाष भागणे, हवालदार शांताराम झाेरे, नितीन डाेमणे, बाळू पालकर, भैरवनाथ सवाईराम, सत्यजीत दरेकर, याेगेश नार्वेकर, विनायक राजवैद्य, महिला हवालदार वैष्णवी यादव व चालक काॅन्स्टेबल अतुल कांबळे यांनी केली.
रत्नागिरीत ब्राउन हेरॉईन जप्त, दोघांना अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 17:47 IST