रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागताच येथील सेतू कार्यालय नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. सुमारे तीन महिने या कार्यालयाचे कामकाज बंद होते. सोमवारपासून हे कार्यालय सुरू झाले आहे. मात्र, कामासाठी येणाऱ्या नागरिकांना कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र अथवा दोन्ही लस घेतल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
सेतू कार्यालये गेल्या तीन महिन्यांपासून बंद असल्याने शैक्षणिक, नोकरी तसेच शासकीय कामकाजासाठी आवश्यक असलेले दाखले रखडले आहेत. त्यामुळे नागरिक सेतू कार्यालय कधी सुरू होते, याची प्रतीक्षा करीत होते.
अखेर, साेमवारपासून सेतू कार्यालयाचे कामकाज पूर्ववत सुरू झाले आहे. मात्र, या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सक्तीने कोरोना निगेटिव्ह चाचणीचा अहवाल सादर करावा लागत आहे. कोरोना चाचणीचा अहवाल नसल्यास दोन्हीही लस घेतल्याचे प्रमाणपत्र सेतूत सादर करावे लागत आहे. नागरिकांमध्ये कोरोना चाचणी करून घेण्याबाबत मोठ्या प्रमाणावर भीती आहे. तर ज्यांनी डोस घेतले आहेत, त्यामध्ये एक डोस घेतलेले बहुसंख्य आहेत. मात्र, अजूनही दुसरा डोस घेतलेले १० टक्केही नागरिक नाहीत. त्यामुळे कोरोना चाचणी अहवाल सादर करण्याची अट जाचक असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
सेतूत कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक केल्याने अनेकांना कोरोना चाचणी करण्याची भीती वाटत आहे. तर, दोन्ही कोरोना लसी घेतलेल्यांची संख्याही अल्प आहे. त्यामुळे कोरोना चाचणीच्या भीतीने नागरिक सेतू कार्यालयाकडे फारसे फिरकत नसल्याचे चित्र दिसत आहे.
दाखल्यांची कामे रेंगाळलेली आहेत. त्यामुळे सेतू कार्यालयासाठीच्या या जाचक अटींबद्दल नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. अजूनही अनेकांना पहिलाही डोस मिळालेला नाही. त्यामुळे ज्यांना पहिला डोस मिळाला आहे, अशांचा पहिला डोस घेतल्याचे प्रमाणपत्र घेऊन त्यांना सेतू कार्यालयात प्रवेश द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
`;