रत्नागिरी : केंद्रीय हिंदी संस्थान, आग्रा या ऐच्छिक हिंदी संस्थेमधून बी.एड्. पदवी धारण केलेले दापोली पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नंदलाल शिंदे यांच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे. माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी किरण लोहार यांची चौकशी अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेकडून नियुक्ती करण्यात आली आहे. अलाहाबाद विद्यापीठातून बी.एड्. पदवी घेतलेल्या ५१ शिक्षकांवर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी कारवाई केली. त्यापैकी २६ शिक्षकांना पदावनत केले असून, उर्वरित २५ शिक्षकांना पाच वर्षांत बी.एड्. पदवी संपादन करण्याची संधी देण्यात आली आहे. अलाहाबाद विद्यापीठातून पदवी घेतलेल्या पदवीधरांच्या प्रमाणपत्रांची चौकशी करताना विस्तार अधिकारी शिंदे यांच्याही कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी शिंदे यांची केंद्रीय हिंदी संस्थान, आग्राची बी.एड्. पदवी असल्याचे पुढे आले होते. त्याचवेळी शिंदे यांची पदवी वादात सापडणार हे निश्चित होते. हिंदी राष्ट्रभाषा सभा, पुणे या संस्थेची राष्ट्रभाषा पंडित पदवी आणि केंद्रीय हिंदी संस्थान, आग्राची बी.एड्. पदवी या दोन्ही पदव्या पदोन्नतीसाठी किंवा सरळ सेवा भरतीसाठी मान्यताप्राप्त नाहीत, असा शासन निर्णय असतानाही तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी कोणत्या आधारे शिंदे यांची विस्तार अधिकारीपदी नियुक्ती केली, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी आता चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. शिंदे यांच्या चौकशीसाठी माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. चौकशी अधिकारी लोहार यांना शिंदे यांच्या चौकशीचा अहवाल एक महिन्यात देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. (शहर वार्ताहर)
बोगस पदवीप्रक रणी चौकशी समिती
By admin | Updated: September 10, 2015 00:49 IST