राजापूर (जि़ रत्नागिरी): विदर्भ-कोकण ग्रामीण बँक शाखा देवाचे गोठणे येथील तत्कालीन शाखाधिकारी दिनेश केशव शेंबेकर यांनी अन्य दोघांना हाताशी धरून अनेक शेतकऱ्यांना लघुउद्योग व दुग्ध व्यवसायासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचे बोगस कर्जवितरण करून फसवणूक केल्याची तक्रार पीडित शेतकऱ्यांनी नाटे पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणामुळे बॅँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून, याबाबत सहायक पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे यांनी चौकशी सुरू केली आहे. तत्कालीन शाखाधिकारी दिनेश शेंबेकर यांच्यासह सुनील जाधव या व्यापाऱ्यासमवेत पुणे येथील रिया इंडस्ट्रीजचे प्रोप्रायटर संजय खेडेकर असे तिघेजण या प्रकरणात सहभागी असल्याची तक्रार देवाचे गोठणे येथील पीडित शेतकरी बबन यशवंत जाधव यांनी नाटे पोलिसांना दिलेल्या अर्जात केली आहे. सन २०११ मध्ये देवाचे गोठणे गावातील काही शेतकऱ्यांना पेपर डिशेस, पत्रावळ्या व द्र्रोण तयार करण्याच्या लघुउद्योगासाठी, तर काहींना दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून खोटी कर्जप्रकरणे करण्यात आली. यामध्ये प्रत्येक कर्जदाराला घसघशीत नफा मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले. या त्रिकुटाने गावातील विदर्भ-कोकण बँकेमार्फत बँकिंगचे नियम धाब्यावर बसवून अनेक लाभार्थ्यांच्या नावे बोगस कर्जप्रकरणे केली, असे या तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे. (वार्ताहर) ़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़ कोट बोगस कर्ज प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे काम चालू आहे. यामध्ये कोणी दोषी आढळून आल्यास त्याच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांना नाटे पोलीस ठाण्यात हजर राहून संबंधित प्रकरणांची माहिती त्वरित देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. - मेघना बुरांडे, सहायक पोलीस निरीक्षक, नाटे पोलीस ठाणे.
विदर्भ-कोकण ग्रामीण बँकेकडून बोगस कर्जवाटप
By admin | Updated: August 3, 2014 01:54 IST