मार्लेश्वर : हवामान बदल या पर्यावरणातील गंभीर समस्येने संपूर्ण जगाला ग्रासून टाकले आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी सृष्टी ज्ञान संस्थेने ‘क्लायमेट अँबॅसॅडर - मुंबई - स्टॉकहोम’ या नावाने सुरु केलेल्या प्रकल्पाद्वारे हवामान बदलाच्या समस्येला समर्थपणे सामोरे जाता येणे शक्य आहे. समृद्ध जैवविविधतेचे रक्षण करणारे निसर्गाचे राजदूत तयार व्हावेत, असे प्रतिपादन कोकणातील देवरायांच्या अभ्यासक व पर्यावरणतज्ज्ञ अर्चना गोडबोले यांनी व्यक्त केले.संगमेश्वर तालुक्यातील मारळ येथील संजीवन अणेराव यांच्या वनालिका हॉलिडे फार्म येथे ‘क्लायमेट अँबॅसॅडर मुंबई - स्टॉक होम’ या प्रकल्पाचे अर्चना गोडबोले यांच्याहस्ते नुकतेच उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी त्या म्हणाल्या की, राज्यात गेल्या काही महिन्यात वारंवार होणारी गारपीट, अवकाळी पाऊस, तापमानातील चढउतार, उपद्रवी कीटकांचा वाढता प्रादुर्भाव या गोष्टी हवामान बदलाच्या द्योतक आहेत. म्हणून याबाबत व्यापक जनजागृती करणे व कृती करणे ही काळाची गरज आहे. ही जनजागृती आता या प्रकल्पाच्या माध्यमातून करता येणार आहे, असे त्यांनी सांगितले.सृष्टी ज्ञान संस्थेचे विश्वस्त प्रशांत महाजन यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून हवामान बदलाचे स्थानिक व वैश्वीक संदर्भ अधोरेखित केले. कोकणातील जंगलतोडीवर सातत्याने आवाज उठवणारे संजीव अणेराव यांनी जंगलतोडीमुळे हवामान बदलाचे संकट गडद होत चालल्याचे स्पष्ट केले. डॉ. प्रा. प्रताप नाईकवाडे यांनी पश्चिम घाटाच्या कोकण परिसरातील वनस्पतींच्या समृद्ध वैविध्याची ओळख करुन देणारा स्लाईड शो सादर केला.सृष्टी ज्ञान संस्थेतर्फे प्रकल्पाची २०१५ मधील रुपरेषा, स्वरुप व गेल्या वर्षातील कार्याची ओळख हर्षदा मिश्रा, ज्योती खोपकर व संगीता खरात यांनी करुन दिली. प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी आत्माराम हुमणे, आंगवली विद्यालयाचे मुख्याध्यापक किसन पवार, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते, सुरेंद्र माने, नंदकिशोर बेर्डे, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे विलास कोळपे उपस्थित होते. सुबोध अणेराव यांनी आभार मानले. (वार्ताहर)
जैवविविधतेचे रक्षक राजदूत तयार व्हावेत
By admin | Updated: May 6, 2015 00:18 IST