रत्नागिरी : तालुक्यातील निरूळ येथील चिरेखाणीवरून अटक केलेल्या १३ बांगलादेशी नागरिकांना पुन्हा त्यांच्या मायदेशात पाठविण्यात येणार आहे. त्यांची सहा महिन्यांची शिक्षा १४ मे राेजी संपणार असून, त्यानंतर १५ मे रोजी त्यांची बांगलादेशात रवानगी केली जाणार आहे. त्यासाठी बांगलादेश-भारताच्या सीमेवरील सुरक्षायंत्रणेच्या (बीएसएफ) ताब्यात दिले जाणार आहे, अशी माहिती पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.दहशतवादीविरोधी पथकाने ११ नोव्हेंबर २०२४ राेजी पूर्णगड पोलिस स्थानकाच्या हद्दीमध्ये ही कारवाई केली हाेती. पाेलिसांनी टाकलेल्या छाप्यात वाहिद रियाज सरदार, रिजऊल हुसेन कारीकर, शरिफुल हौजिअर सरदार, फारूख महमंद जहिरली मुल्ला, हमीद मुसाफा मुल्ला, राजू अहमंद हजरतअली शेख, बाकीबिलाह अमिर हुसेन सरदार, सैदूर रेहमान मुबारक अली, आलमगीर हुसेन हिरा, अबदुल कादर दलाल, मोहम्मद शाहेन समद सरदार, मोहम्मद नुरूझामन मोरोल बालायत अली, मोहम्मद लालतू मोंदल किताब अलीस या तेरा जणांना अटक केली हाेती.
पाेलिसांनी अधिक तपास केला असता त्यांना भारतीय असल्याबाबतचे कुठल्याही प्रकारचे पुरावे सादर करता आले नाहीत. त्यावरून हे सर्व भारतामध्ये अनधिकृतरित्या प्रवेश करून राहात असल्याची खात्री झाली हाेती. त्या आधारे रत्नागिरी पोलिस दलाने पासपोर्ट अधिनियम, परदेशी व्यक्ती अधिनियमअंतर्गत गुन्हा दाखल करुन दोषारोपपत्र दाखल केले हाेते.त्याची सुनावणी होऊन रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य न्यायदंडाधिकारी निखिल गोसावी यांनी १३ जणांना प्रत्येकी ६ महिने साधी कैद व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली हाेती. या सर्वांची १४ मे २०२५ राेजी शिक्षा पूर्ण होणार आहे. त्यानंतर त्यांना १५ मे राेजी त्यांच्या मायदेशी पाठविण्यात येणार आहे.
बांगलादेशी नागरिकांना त्यांच्या मायदेशी पाठविण्यासाठी लागणारी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घेतली जाणार आहे. शासकीय परवानगीनंतर पोलिसांचे एक पथक या १३ बांगलादेशीयांना सीमेवरील बीएसएफच्या ताब्यात देणार आहे. ते त्यांना बांगलादेशाच्या स्वाधीन करतील. - धनंजय कुलकर्णी, जिल्हा पाेलिस अधीक्षक, रत्नागिरी.