दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोणत्याही वृत्तपत्रात निविदा प्रकाशित न करता वाकवली प्रक्षेत्रातील तब्बल ३६४ खैराच्या झाडांची लिलाव प्रक्रिया गुरूवारी राबविल्याने ही लिलाव प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. याला अनेक स्थानिक लाकूड व्यापाऱ्यांनी लेखी आक्षेप घेतला असला, तरी याचा प्रस्ताव मंजुरीकरिता विद्यापीठ प्रशासनाकडे रवाना करण्यात आला आहे.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील वाकवली प्रक्षेत्रात गुरूवार, १० मार्च रोजी ३६४ खैराच्या झाडांची लिलाव प्रक्रिया निश्चित केली होती. यानुसार अनेक स्थानिक लाकूड व्यापारी या लिलाव प्रक्रियेत भाग घेण्याकरिता सकाळीच प्रक्षेत्रावर पोहोचले असता त्यांचे अर्ज भरून घेण्यास नकार देण्यात आला. याकरिता निविदा अर्ज देण्याची वेळ सकाळी १० वाजताच संपली, असे कारण सांगण्यात आले. तसेच ज्यांनी या आधी अर्ज नेले होते, त्यांना दुपारी १२ वाजेपर्यंतची मुदत देऊन निविदा दुपारी ३ वाजता सर्वांसमक्ष उघडण्यात आली. यातील सर्वांधिक बोली लावणाऱ्या व्यक्तीच्या नावाने अहवाल तयार करून तो मंजुरीकरिता विद्यापीठ प्रशासनाकडे पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, स्थानिक लाकूड व्यापाऱ्यांनी या लिलाव प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच दापोलीतील पत्रकारांनी वाकवली प्रक्षेत्राशी संपर्क साधला असता, त्यांना सदर लिलाव प्रक्रियेची माहिती कोणत्याही दैनिकात प्रसिध्द करण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती देण्यात आली. यावर स्पष्टीकरण देताना ‘येथे अनेक वर्तमानपत्र असल्याने आम्ही स्थानिक पातळीवर जाहीरात देत नाही’ असे सांगण्यात आले. तसेच वर्तमानपत्रात जाहिरात देण्याबाबत विद्यापीठ प्रशासनाने माहिती संचालनालय, कोकण भवन येथे कळवले असल्याचे सांगण्यात आले. मात्र, कोकण भवन येथे सदर पत्र उशिरा मिळाल्याने त्यांनीदेखील कोणत्याही दैनिकात जाहिरात न देताच ही लिलाव प्रकिया राबविल्याचे सांगण्यात आले. मात्र, कोकण भवन येथे पत्र उशिरा का पाठवण्यात आले, याबाबत योग्य खुलासा विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आलेला नाही. या साऱ्या गोंधळामुळे स्थानिक लाकूड व्यापाऱ्यांना या लिलाव प्रक्रियेत भाग घेता आला नाही. यामुळे या प्रक्रियेला स्थानिक व्यापाऱ्यांनी विरोध केला असून, प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)
खैराच्या झाडांचा लिलाव वादात
By admin | Updated: March 13, 2016 01:09 IST