राजापूर : तालुक्यातील भालावली येथील दरोडा प्रकरणातील संशयित अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नसतानाच महामार्गावर ओणी येथील पेट्रोलपंप लुटण्याच्या उद्देशाने तीन संशयित आल्याची जोरदार चर्चा ओणी परिसरात सुरू आहे. त्यामुळे दोन दिवस स्थानिक ग्रामस्थांसह पोलीस पथकाला रात्र जागून काढावी लागली. राजापूर तालुक्यात दरोडा घालणारी टोळी कार्यरत असल्याची शक्यता निर्माण झाल्याने तालुक्यात घबराट निर्माण झाली आहे. शनिवारी रात्री तालुक्यातील ओणी येथे मुंबई - गोवा महामार्गावरील प्रसन्न पेट्रोलपंपाच्या परिसरात तीन अज्ञात तरुण पेट्रोलपंपाची टेहळणी करताना येथील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. बराच काळ ते पंपाच्या परिसरात फिरत होते. त्यांचे वर्तन संशयास्पद आढळल्याने पंपावरील एका कर्मचाऱ्याने कासारवाडीतील आपल्या मित्राना याबाबत कल्पना दिली. त्यानंतर थोड्याच वेळात सुमारे १०० ते १५० गावकऱ्यांनी हातात लाठ्या काठ्या घेऊन पंपाच्या दिशेने धाव घेतली. मोठ्या संख्येने आलेल्या त्या गावकऱ्यांना पाहून बराच काळ तेथे घुटमळणाऱ्या तीन अज्ञातानी पंप परिसरातून पोबारा केला. त्यामुळे संशय बळावला. कदाचित पंपावर दरोडा टाकण्याच्या उद्देशानेच ते तिघे फिरत असावेत, असा कयास बांधला जात आहे. त्याच रात्री समस्त गावकऱ्यांनी पहाटे ५ वाजेपर्यत पंपावर थाबून तेथील कर्मचाऱ्यांना साथ दिली. सकाळी याबाबतचे वृत्त सर्वत्र वाऱ्यासारखे पसरले. राजापूर पोलिसांनाही कल्पना देण्यात आली. रविवारी रात्री राजापूर पोलिसांनी त्या पेट्रोलपंपावर चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र, त्या रात्री कोणताच अनुचित प्रकार घडला नाही. गेले दोन दिवस परिसरात दरोडा टाकणारी टोळी कार्यरत असल्याची चर्चा असल्याने रविवारची रात्र गावकऱ्यांनी जागून काढली. ओणीतील या घटनेनंतर काही ठिकाणी दहा ते बाराजणांचे टोळके संशयास्पदरित्या फिरत असल्याची चर्चा तालुकाभरात सर्वत्र सुरु होती. भालावलीतील बावधाने कुटुंबातील दोन महिलांना बांधून मारहाण करण्यात आली, हा प्रसंग आपल्यावर येऊ शकतो, या भीतीने अनेकांची गाळण उडाली. (प्रतिनिधी)
ओणी पेट्रोल पंपावर दरोडा घालण्याचा प्रयत्न?
By admin | Updated: September 10, 2015 00:48 IST