लांजा : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार नीलेश राणे यांनी दिलेल्या दणक्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. ३० मेपर्यंत डांबरीकरण पूर्ण न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा राणे यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर हे काम तत्काळ सुरू करण्यात आले.
साखरपा परिसरातील रस्त्यांची दुरवस्था
साखरपा : रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या साखरपा परिसरातील रस्त्यांची दुरवस्था अद्यापही कायम आहे. पावसाळ्यापूर्वी नादुरुस्त धोकादायक रस्त्यांची प्राधान्याने दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालक, नागरिकांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकदा करण्यात आली आहे.
कोरोनाबाधित रुग्ण नाही
खेड : तालुक्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. ही दिलासादायक बाब आहे. पण शहरालगतच्या सुसेरी, खारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आढळत आहे. ही बाब खेदजनक असतानाच तालुक्यातील आठ गावांमध्ये आजतागायत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही.
रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते नाचरेकरवाडी हा सुमारे दोन किलाेमीटर लांबीचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. पंचक्रोशीवासीयांनी डांबरीकरणासाठी वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही न्याय्य मागणी अद्यापपर्यंत मंजूर झालेली नाही. त्याबद्दल ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
रत्नागिरी तालुक्यात पंचनामे पूर्ण
रत्नागिरी : चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या रत्नागिरी तालुक्यातील फळबागा, घरे, गोठे, समाजमंदिर, सार्वजनिक मालमत्ता आदींच्या पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. वित्तहानीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. समुद्रकिनारपट्टी परिसरातील गावांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
कर्मचारीच गरळ ओकताहेत
राजापूर : शासनाच्या सेवेत असतानाही आणि शासनाकडील सगळे लाभ घेणारे काही राज्य शासनाचे कर्मचारी सोशल मीडियावरून राज्य शासनाच्या विरोधातच गरळ ओकत असल्याने सामान्य जनतेत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे यामध्ये शिक्षकांचा समावेश असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांकडून ॲंटिजन चाचणी मोहीम
लांजा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन सातत्याने केले जात आहे. तरीही विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशा सर्वांची ॲंटिजन चाचणी करण्याची धडक मोहीम पोलीस यंत्रणा, नगर पंचायत आरोग्य विभागाने सुरू केली आहे.
शिक्षकांचा आंदोलनाचा इशारा
देवरूख : राज्यातील विनाअनुदानित, अंशत: अनुदानित, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न अद्यापही कायम आहेत. या प्रश्नांची सोडवणूक लवकरात लवकर व्हावी, या उद्देशाने शिक्षक समन्वय संघाचे के.पी. पाटील यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी शिक्षकांचे मागण्याचे निवेदन सादर करून आंदोलनाचा इशारा दिला.
नियमित खत पुरवठ्याची मागणी
लांजा : शेतकरी, बागायतदारांसह सर्वसामान्यांना नियमित दरानेच खतांचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी तालुका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. केंद्र शासनाने खतांच्या किमतीत विक्रमी वाढ केल्याने सर्व संबंधितांवरील संकटात आणखीच भर पडली आहे.
पीपीई किटचे वाटप
खेड : मनसे, रत्नागिरी जिल्हा कामगार सरचिटणीस संदीप फडकले यांच्या माध्यमातून धामणदेवी विभागात असगणी, सात्विणगाव, आयनी, मेटे या गावांमध्ये कोरोना महामारीच्या परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या आशासेविकांना पीपीई किटचे वाटप करण्यात आले. यावेळी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते.