लाेकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून, शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये तब्बल ५६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा २,२३२ वर पोहोचला आहे. सध्या ६८२ रूग्ण ॲक्टिव्ह असून, आजपर्यंत तालुक्यात १०४ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवार, २३ मे ते शनिवार, २९ मे या आठवड्याच्या कालावधीत ३२० कोरोनाबाधित रूग्ण तालुक्यात आढळले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निखील परांजपे यांनी दिली.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत राजापूर तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तालुक्यात आजपर्यंत एकूण २,२३२ रुग्णांची नोंद झाली असून, १,४४६ जण उपचाराअंती बरे झाले आहेत तर १०४ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सध्या ६८२ रूग्ण ॲक्टिव्ह असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. यामध्ये रायपाटण कोविड सेंटरमध्ये ९५ रुग्ण, धारतळे कोविड सेंटरमध्ये २४, जिल्हा शासकीय रुग्णालयात ५९ रुग्ण उपचार घेत आहेत तर ४५७ जण गृह अलगीकरणात उपचार घेत आहेत. खासगी रुग्णालयात १४ जण तर तालुक्याबाहेर ३३ जण उपचाराखाली आहेत, असे डॉ. परांजपे यांनी सांगितले.
या आठवड्यात दि. २३ ते २९ मे या कालावधीत ३२० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये २३ मे रोजी ३६, २४ मे रोजी सर्वाधिक ७५, तर २५ मे रोजी ३२, २६ मे रोजी ५०, २७ मे रोजी ३५, २८ मे रोजी ३६, शनिवार, २९ मे रोजी ५६ रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसेंदिवस वाढणारा कोरोनाबाधितांचा आकडा राजापूरकरांसाठी धोक्याची घंटा असून, नियम व अटींचे पालन न केल्यास भविष्यात कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे.