रत्नागिरी : लाडक्या कन्येचा मृत्यू डोळ्यादेखत झाल्याचा धक्का सहन न झाल्याने पित्याचाही मृत्यू झाला. एकाचवेळी दोघांवर अंत्यसंस्कार करताना उपस्थितांना अश्रू अनावर झाले.तालुक्यातील बसणी गावातील कदम कुटुंबियांना बापलेकीच्या मृत्यूचा धक्का सोसावा लागला आहे. जिल्हा परिषदमध्ये आरोग्य विभागात सहायक लेखाधिकारी म्हणून नंदकुमार कदम (वय ५५) कार्यरत होते. त्यांचे मूळ गाव हे शहरालगतचे बसणी हे आहे. गेली जवळपास ते २५ वर्ष जिल्हा परिषद भवनात विविध विभागात कार्यरत होते. त्यांची मोठी मुलगी प्राजक्ता (वय २८) शिक्षण पूर्ण झाल्यानंतर खासगी नोकरी करीत होती. तिचे लग्नही ठरले होते. त्यामुळे कदम कुटूंबिय आनंदात होते.अचानक प्राजक्ता आजारी पडली. वैद्यकीय तपासणीवेळी कर्करोगाचे निदान झाले, तातडीने प्राजक्तावर उपचार सुरू करण्यात आले. त्यासाठी पै-पै गोळा करून नंदकुमार यांनी लेकीवरील उपचारासाठी धडपड सुरू केली. गेले वर्षभर त्यांनी अनेक वेळा रजा टाकून उपचारासाठी प्रयत्न करीत होते. प्राजक्ता आजारातून बाहेर पडू लागली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी घरात अचानक तिला फिट आली. त्यावेळी नंदकुमार यांनी तातडीने उपचारासाठी डॉक्टरांकडे नेण्यासाठी घाई केली. मात्र प्राजक्ताने वडिलांच्या हातावरच अखेरचा श्वास घेतला.लाडक्या लेकीचा डोळ्यादेखत मृत्यू झाल्याचा धक्का नंदकुमार यांना सहन झाला नाही. तेही धाडकन खाली कोसळले. त्यांना डॉक्टरांकडे नेण्यात आले. दुर्दैवाने त्यांचाही मृत्यू झाला. पित्याच्या व कन्येच्या निधनामुळे कदम कुटुंबियांना फार मोठा धक्का बसला आहे.
कन्येपाठोपाठ पित्यानेही सोडले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 13:18 IST
Death Ratnagiri- लाडक्या कन्येचा मृत्यू डोळ्यादेखत झाल्याचा धक्का सहन न झाल्याने पित्याचाही मृत्यू झाला. एकाचवेळी दोघांवर अंत्यसंस्कार करताना उपस्थितांना अश्रू अनावर झाले.
कन्येपाठोपाठ पित्यानेही सोडले प्राण
ठळक मुद्देकन्येपाठोपाठ पित्यानेही सोडले प्राणएकाचवेळी दोघांवर अंत्यसंस्कार