देवरुख : समाजात माणसे विविध प्रकारे आपले जीवन जगत असतात. माणूस हा आपल्या प्रकृतीनुसार जीवन जगण्याची कला आत्मसात करीत असतो. देवरूख नजीकच्या आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा असाच एक विद्यार्थी गेल्या पंधरा वर्षांपासून लाकूड व बांबूपासून विविध कलाकृती बनवण्याची कला छंद म्हणून जोपासत आहे. काही माणसे आपल्या नोकरी व्यवसायातील कामात मन रमवून जीवन क्रमण करतात, तर काही एखादी कला जोपासून स्वत:चे व इतरांचे जीवन सुंदर बनवताना आपले वेगळेपण दाखवून देतात. असाच एक अभिजीत एकनाथ गानू! अभिजीज हा या महाविद्यालयाच्या मेकॅनिकल्स इंजिनिअरिंग शाखेच्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतानाच तो ही कला एक आवड म्हणून जोपासताना दिसत आहे. लाकूड व बांबूपासून विविध वस्तू बनवण्याचे तंत्र त्याने पंधरा वर्षांपासून अवगत केले आहे. कोणतेही व्यावसायिक मार्गदर्शन नसताना तो स्वत: यासाठी लागणारी माहिती व सामुग्री गोळा करतो. अशा प्रकारे त्याने आजपर्यंत काष्ठशिल्प प्रकारामध्ये लॅम्पशेड, टीपॉय तसेच बांबूपासून फुले, ट्रे, फ्लॉवर पॉट तसेच लॅम्पशेडसारख्या मोहक कलाकृती घडवल्या आहेत. तो देवरुख येथील रहिवासी असून, त्याच्याकडे विविध कलाकृतींसाठी देवरुख व मुंबई परिसरातून मागणी असते. मात्र, शिक्षण पूर्ण करताना वेळेचा अभाव असल्याने फक्त छंद म्हणून ही कला जोपासत असल्याचे तो सांगतो.जंगलात जाऊन लाकूड व बांबू गोळा करणे, त्यातील खराब भाग काढून टाकणे, लाकडाची साल काढणे, पॉलिशिंग, पावडर कोटिंग व टचवूड लावणे यांसारख्या पद्धतींचा अवलंब केला जातो. त्यातून मोहक व सुबक अशा कलाकृती बनवल्या जातात. (प्रतिनिधी)
अभिजीत घडवतोय ‘अभिजात’ शिल्प कलाकृती
By admin | Updated: September 17, 2014 22:24 IST