रत्नागिरी : येथील तटरक्षक दलाद्वारे जहाज दुरूस्ती केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्रात ट्रॅव्हल लिफ्ट आणि बर्थिंगची सुविधा आहे. तटरक्षक दलातर्फे उभारण्यात येणारा हा पहिलाच जहाज दुरुस्ती प्रकल्प असून, या प्रकल्पाची तटरक्षक दलाच्या पश्चिम तटाचे प्रमुख कमांडर अतिरिक्त महानिर्देशक के. आर. सुरेश यांनी माहिती घेतली.तटरक्षक दलाच्या पश्चिम तटाचे प्रमुख कमांडर अतिरिक्त महानिर्देशक के. आर. सुरेश यांनी गुरुवार, (दि.२०) रोजी रत्नागिरीचा दौरा केला. यावेळी त्यांनी रत्नागिरीस्थित तटरक्षक दलाच्या किनारी आणि सागरी युनिट्सच्या कार्य तत्परतेबाबत, चालू व प्रस्तावित विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेतला.रत्नागिरी येथील तटरक्षक दलाद्वारे उभारण्यात येणारा जहाज दुरुस्ती केंद्र हा या दौऱ्याचा केंद्रबिंदू होता. या प्रकल्पाची त्यांनी माहिती घेतली. तसेच कामाचा आढावाही घेतला. फ्लॅग अधिकाऱ्यांद्वारे जवानांना केलेल्या मार्गदर्शनावेळी त्यांनी तटरक्षक दलाच्या सागरी आणि हवाई प्रयत्नांना मजबूत करण्याच्या उपायांवर भर दिला.रत्नागिरीतील भगवती बंदर येथे तटरक्षक दलाच्या जहाज दुरूस्ती प्रकल्पाची रूपरेषा पाहताना अतिरिक्त महानिर्देशक के. आर. सुरेश यांच्यासोबत तटरक्षक रत्नागिरीचे कमांडर उपमहानिरीक्षक शत्रूजित सिंग व इतर अधिकारी उपस्थित होते.
तटरक्षक दलाद्वारे रत्नागिरीत जहाज दुरूस्ती केंद्र उभारण्यात येणार
By शोभना कांबळे | Updated: April 21, 2023 15:57 IST