आरवली: भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्या पाेल्ट्री फार्ममध्ये अडकल्याची घटना रविवारी सकाळी संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे घडली. वन विभागाने अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनी त्याला पिंजऱ्यात जेरबंद केले.मुंबई-गोवा महामार्गाजवळील तुरळ सांगडेवाडी येथील मधुकर कुंभार यांचा मुलगा अवधूत कुंभार यांचा पाेल्ट्री व्यवसाय आहे. त्यांच्या घरामुळे मागे एक पाेल्ट्री फार्म आहे. रविवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान या फार्ममध्ये बिबट्या शिरल्याचे त्यांच्या लक्षात आले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हे कळविण्यात आले. तातडीने वन विभागाचे बचाव पथक पिंजरा व आवश्यक साहित्यासह घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने बिबट्याला पकडण्यासाठी पोल्ट्री फार्मच्या सभोवार शेडनेट लावले.पाेल्ट्रीच्या मुख्य दरवाज्याच्या तोंडावर पिंजरा लावण्यात आला. अडीच तासांच्या प्रयत्नानंतर हा बिबट्या सुरक्षितपणे पिंजऱ्यात कैद करण्यात आला. नंतर कडवईतील पशुवैद्यकीय अधिकारी बेलोरे यांनी त्याची तपासणी केली. तो तंदुरुस्त असल्याचे निदर्शनास येताच त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.संगमेश्वरचे पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण, कॉन्स्टेबल संदेश जाधव, सोमनाथ खाडे, गिरप्पा लोखंडे, सिद्धेश आंबरे, अरुण वानरे व रमेश गावित घटनास्थळी उपस्थित होते. तसेच वन विभागाचे अधिकारी प्रकाश सुतार, परिमंडळ वनअधिकारी न्हानू गावडे, साखरपा वनरक्षक सहाय्यक कराडे, फुणगूसचे आकाश कडुकर, दाभोळेच्या सुप्रिया काळे, वनरक्षक शर्वरी कदम, आरवलीचे किरण पाचारणे, साखरप्याचे सूरज तेली, रणजीत पाटील, प्राणीमित्र महेश धात्रे, निसर्गमित्र अनुराग आखाडे, संदीप गुरव व संदीप उजगावकर उपस्थित होते.याशिवाय कडवईचे उपसरपंच दत्ताराम ओकटे, पोलिस पाटील वर्षा सुर्वे, आप्पा पाध्ये, संजय ओकटे, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र हरेकर, अरविंद जाधव, कृष्णा हरेकर व दिलीप सावंत उपस्थित होते.
बिबट्या नैसर्गिक अधिवासातहा बिबट्या मादी जातीचा असून, त्याचे अंदाजे वय अडीच ते तीन वर्षे आहे. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.