देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील साडवली कासारवाडी येथे बुधवारी सकाळी बिबट्या एका घरामागे येऊन बसला. माणसाला पाहूनही तो उठला नाही. त्याला वनविभागाने सुरक्षितरीत्या ताब्यात घेऊन तपासले असता त्याच्या डाव्या पायाच्या मांडीला जखम असल्याचे स्पष्ट झाले. वनविभागाने त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत.साडवली कासारवाडी येथील राजेंद्र धने यांचे घराच्या मागील बाजूला बिबट्या बसलेला होता. बुधवारी सकाळी पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास तो धने यांना दिसला. त्यांनी पोलिस पाटील यांच्याशी संपर्क साधला. पोलिस पाटलांनी तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला ताब्यात घेतले. ही माहिती परिसरातील ग्रामस्थांना कळताच बिबट्याला पाहण्याकरिता घटनास्थळी एकच गर्दी झाली होती.बिबट्या सहसा मानवी वस्तीत येऊन बसल्याचे निदर्शनास येत नाही. त्यातही दिवसाच्या वेळी तो एकाच ठिकाणी बसलेला असल्याने तो जखमी किंवा भुकेलेला असावा असा अंदाज होता. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला सुरक्षितरीत्या पिंजऱ्यात बंदिस्त केले. पशुवैद्यकीय सहायक आयुक्त युवराज शेटे व कोल्हापूर वनविभागाचे वन्य जीव पशुवैद्यक संतोष वाळवेकर यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली.हा बिबट्या नर असून, वय ३ ते ४ वर्षे आहे. त्याच्या मागील डाव्या पायाच्या मांडीला जखम आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर उपचार केले. सद्यस्थितीत तो पिंजऱ्यामध्येच असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तो पूर्ण बरा झाल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात साेडण्यात येणार आहे.घटनास्थळी सहायक वनसंरक्षक प्रियंका लगड, परिक्षेत्र वनअधिकारी प्रकाश सुतार, परिक्षेत्र वनअधिकारी (फिरते पथक) जितेंद्र गुजले, वनपाल सागर गोसावी, सारिका फकीर, वनरक्षक आकाश कडूकर, वनरक्षक सहयोग कराडे, वनरक्षक सुप्रिया काळे, वनरक्षक सुरज तेली, वनरक्षक नमिता कांबळे, वनरक्षक श्रावणी पवार, वनरक्षक विशाल पाटील, वनरक्षक दत्तात्रय सुर्वे, वनरक्षक रणजीत पाटील, पोलिस पाटील साडवली व ग्रामस्थ उपस्थित होते.
Ratnagiri: बिबट्या घरामागे बसला, माणसाला पाहूनही नाही उठला!; वनविभागाने घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 15:25 IST