रत्नागिरी : दोन वर्षापूर्वी भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागातर्फे संभाव्य दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यातील १६ गावे जाहीर करण्यात आली होती. त्यात आज संभाव्य म्हणून आणखी ६३ गावांचा समावेश झाल्याने आता जिल्ह्यातील एकूण ७९ गावे संभाव्य दरड कोसळण्याची शक्यता असलेली गावे म्हणून जाहीर झाली आहेत. या सर्व गावांची पाहणी करून त्याबाबतचा आढावा शनिवारी होणाऱ्या बैठकीवेळी सादर करण्याच्या सूचना सर्व तालुक्यांना दिल्या असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे यांनी आज दिली. माळीण येथे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सर्व संबंधित विभागप्रमुखांची तातडीने बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांना संभाव्य आपत्तीचाच सामना करण्यासाठी सतर्क राहाण्याच्या सूचना केल्या. यावेळी सर्व तालुक्यांकडून मागविण्यात आलेल्या माहितीच्या अनुषंगाने सध्या संभाव्य दरड कोसळण्याची शक्यता असलेली ६३ गावे जाहीर करण्यात आली आहेत. दोन वर्षापुर्वी भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागातर्फे संभाव्य दरड कोसळण्याची शक्यता असलेली १६ गावे जाहीर करण्यात आली होती. त्यात आता आणखी ही ६३ गावे जाहीर झाली आहेत. मात्र, यावर्षी रत्नागिरी, लांजा आणि राजापूर तालुक्यातील संभाव्य गावांमध्ये वाढ झालेली नाही. दापोली, खेड, संगमेश्वर या तालुक्यांमध्ये दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या गावांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर, चिपळूण, गुहागर आणि मंडणगड या तीन तालुक्यांमध्ये नव्याने संभाव्य गावे जाहीर झाली आहेत.या गावांची पाहणी करण्याच्या सूचना आज जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. येत्या शनिवारी होणाऱ्या बैठकीत या अहवालावरून त्यावरून त्या गावांबाबत कोणती उपाययोजना करावी लागणार आहे, हे ठरविण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात ७९ गावांच्या डोक्यावर डोंगराची टांगती तलवार!
By admin | Updated: July 31, 2014 23:22 IST