राजापूर : तालुक्यातील शिवणे बुद्रुक येथे लघु पाटबंधारे याेजनेंतर्गत धरण बांधण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या धरणामुळे २२८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून, भूसंपादनासाठी ४२५ लाख आगावू रक्कम वर्ग करण्यात आली आहे. अधिसूचना काढण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. शेतकरी व ग्रामस्थ यांच्या असणाऱ्या समस्यांबाबत शिवणे बुद्रुक येथील कालिका माता मंदिरात आमदार राजन साळवी यांच्या अध्यक्षतेखाली जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांसवेत बैठक आयाेजित करण्यात आली हाेती. या बैठकीत ग्रामस्थांच्या शंकांचे निरसर करण्याचे काम करण्यात आले. यावेळी जलसंधारणच्या अधिकाऱ्यांनी कामाबाबत माहिती दिली.
शिवणे बुद्रुक येथील लघु पाटबंधारे योजनेच्या मूळ अंदाजपत्रकाला मंजुरी देऊन औरंगाबाद येथील महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाने २१५८.६४ लाख इतक्या रकमेला प्रशासकीय मान्यता दिली आहे. या योजनेला महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडून प्रवाही योजनेअंतर्गत निधी उपलब्ध झाला आहे. या धरणाची लांबी ३९२.०० मीटर व सँडल १९० मीटर असून, उंची ३७.२८ मीटर आहे. या योजनेचा एकूण पाणीसाठा ३११७.४५ द.घ.मी आहे. या योजनेचा मार्च २०२१ अखेर खर्च ४८५० लाख इतका झालेला आहे. कालव्याची व धरणाची उर्वरित कामे करण्यासाठी या योजनेचे सुधारित अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, पुणे येथील मृद व जलसंधारण प्रादेशिक कार्यालयाचे अप्पर आयुक्त यांना सादर करण्यात आले आहे.
या बैठकीला जलसंधारण विभागाचे पानगले, सभापती करुणा कदम, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, उपतालुकाप्रमुख विश्वनाथ लाड, तात्या सरवणकर, विभागीय संघटक उमेश पराडकर, माजी शिक्षण व अर्थ सभापती शरद लिंगायत, विभागप्रमुख वसंत जड्यार, नरेश दुधवडकर, कमलाकर कदम, स्वप्नील (बंटी) शिंदे, सरपंच प्रकाश साखळकर, उपसरपंच संदीप नाडणकर, शाखाप्रमुख अभिषेक साखळकर, गावप्रमुख मनोहर करंबे, रामचंद्र करंबे, अनंत करंबे, वाडीप्रमुख चंद्रकांत गुरव, बाळकृष्ण पराडकर, मोहन गुरव, राघो जाधव, पोलीसपाटील सुधाकर भोसले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
-------------------
भूसंपादनाचा माेबदला लवकर अदा करणार
राजापूर येथील उपविभागीय अधिकारी यांच्याकडून भूसंपादन कार्यवाही पूर्ण होऊन महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडून निधी प्राप्त झाल्यास लवकरात लवकर भूसंपादनाचा मोबदला अदा करण्याचे प्रस्तावित आहे. पुढील आठवड्यामध्ये मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या दालनात बैठक लावून अन्य शंका, त्रुटींचे निरसन केले जाईल, असे आश्वासन आमदार राजन साळवी यांनी दिले.