रत्नागिरी : प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत दि. १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत विशेष सप्ताह जिल्ह्यातील ग्रामीण उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय यामध्ये राबविण्यात आला. या विशेष मोहिमेदरम्यान एकूण ९५० नवीन पात्र लाभार्थींची नोंद करण्यात आली. या नवीन पात्र लाभार्थींसाठी १६ लाख ७४ हजार रुपये एवढे अनुदान सप्ताहदरम्यान त्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यासाठी जानेवारी २०१७ ते मार्च २०२२ या कालावधीत एकूण लाभार्थी नोंदणीसाठी ३९,६०६ चे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत २७,२६९ लाभार्थी नोंदणी (९२.११ टक्के) पूर्ण झाली आहे. या लाभार्थींच्या खात्यावर ११ कोटी ४३ लाख २८ हजार रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राबविण्यात आलेल्या ‘मातृ वंदना सप्ताह’ दरम्यान जिल्ह्यात, तालुक्यात ग्रामीण स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व शहरी भागात नागरी प्राथमिक केंद्र स्तरावर आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा, गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत प्रभात फेरी व सप्ताहाचे जनजागरण करण्यात आले. गरोदर स्त्रिया व स्तनदा माता विशेष आरोग्य तपासणी शिबिर, लसीकरण सत्र, नवीन खाते उघडण्यासाठी पोस्ट कॅम्प, पोषण आहार संदर्भांत विविध कार्यक्रम नियोजन व नियमित लसीकरण सत्राचे कोविड-१९ नियमाचे पालन करून आयोजन करण्यात आले. मातृ वंदना सप्ताह अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदूराणी जाखड, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अनिरूद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तालुका आरोग्य अधिकारी व त्यांचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत पात्र असलेल्या पहिल्या खेपेच्या गरोदर मातां लाभार्थींनी आपल्या जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत किंवा रुग्णालयात जाऊन नोंद करणे आवश्यक आहे. योजनेविषयी अधिक माहितीसाठी आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका व कोणत्याही शासकीय संस्थेशी संपर्क साधावा. योजनेचा जास्तीत जास्त पात्र मातांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव, उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती उदय बने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. राजन शेळके, जिल्हा कार्यक्रम समन्वयक प्रवीण डुब्बेवार यांनी केले आहे.
चिपळुणात सर्वाधिक काम...
मातृ वंदना सप्ताहात रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्याने माता नोंदणीचे सर्वाधिक काम केले आहे. त्या खालोखाल रत्नागिरी तालुका व संगमेश्वर तालुक्यांचे काम झाले आहे. त्यामुळे चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर तालुका आरोग्य अधिकारी अनुक्रमे डॉ. ज्योती यादव, डॉ. महेंद्र गावडे आणि डॉ. शेरॉन सोनवणे यांचा या विशेष कामाबद्दल गाैरव होणार आहे.