माथेरान : दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून उन्हाळ्याच्या काहिलीने मनुष्यप्राण्यांचे हाल होत आहेत. यासाठी नेरळ-माथेरान या टॅक्सी संघटनेच्या वतीने पक्षी आणि प्राण्यांसाठी घाटरस्त्यातील जंगलात पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत. टॅक्सी संघटनेच्या या सेवाभावी भूमिकेमुळे पशू-पक्ष्यांना आणि जंगलातील प्राण्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.नेरळ आणि माथेरान या घाट रस्त्याच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक करून पर्यटकांना सुखरूप प्रवास घडविणारे म्हणून या टॅक्सी संघटनेची ओळख आहे. आपल्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे हे टॅक्सी चालक आता जंगलातील पक्षी आणि प्राण्यांच्या जगण्यासाठी सरसावले आहेत. माथेरानच्या पायथ्यापासून थेट दस्तुरी नाका या भागात जंगल वणव्यांनी काळेकुट्ट झाले आहेत. अशावेळी पशू-पक्षी आणि प्राण्यांना झाडांचा विसावा घेण्यासाठी नवीन आडोसा शोधावा लागत असल्याची गरज टॅक्सी चालकांना वाटली. कारण २४ तास टॅक्सी सेवा देणाऱ्या या संघटनेच्या चालकांना काही महिन्यांपासून घाट रस्त्यातून जाताना आणि खाली उतारताना पक्षी आणि प्राणी फार तुरळक प्रमाणात दिसून येत आहेत. त्याचवेळी घाटात आणि परिसरातील जंगलात प्राण्यांची शिकार होऊ नये म्हणून तत्पर असलेल्या टॅक्सी चालकांनी पशू-पक्षी आणि प्राणी यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय घाटरस्त्यातील झाडांच्या सावलीत करण्याचा निर्णय घेतला.नेरळ-माथेरान टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष संतोष शेळके यांनी आपल्या सदस्यांची संकल्पना तत्काळ प्रत्यक्षात आणण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी सर्व सदस्यांची मते जाणून घेत घाट रस्त्यात नेरळ हुतात्मा चौक ते दस्तुरी नाका येथे पाण्याची सोय करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी करताना संघटनेने १२ प्लास्टिक पाण्याचे पिंप खरेदी केले, ते पिंप उभे अर्धवट कापून त्यात एकावेळी दोन साठवण टाक्या तयार केल्या. त्या टाक्या संघटनेच्या वतीने घाट रस्त्यातील झाडांच्या आडोशाला मंगळवार, २५ एप्रिल रोजी सकाळी ठेवण्यात आल्या. टॅक्सी संघटनेच्या सर्व सदस्यांनी घाट रस्त्यात स्वत: त्या पाण्याच्या साठवण टाक्या आणि त्यांच्या बाजूला पाण्याबाबत संदेश असलेले फलक उभे करण्यात आले. पक्षी आणि प्राणी यांच्यासाठी बनविण्यात आलेल्या त्या साठवण टाक्यांमध्ये टॅक्सी संघटनेचे कार्यकर्ते दररोज पाणी भरून ठेवणार आहेत. या टाक्या संघटनेचे अध्यक्ष संतोष शेळके, माथेरान नगरपरिषदेचे उपाध्यक्ष आकाश चौधरी, टॅक्सी संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र मिसाळ,खजिनदार सचिन लोभी, दत्ता जाधव आदींनी जंगलात नेवून ठेवल्या. टॅक्सी संघटनेच्या या सेवाभावी प्रकल्पाचे नेरळचे वन अधिकारी एन. डी. राठोड यांनी अभिनंदन केले. वन्य जीवांसाठी टॅक्सी संघटनेप्रमाणे सर्वांनी पुढे सरसावले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. (वार्ताहर)
माथेरानच्या घाट रस्त्यात वन्यजीवांसाठी पाणपोई
By admin | Updated: April 26, 2017 00:29 IST