आगरदांडा : मुरुड - आगरदांडा येथील दिघी पोर्ट कंपनीने आपल्या गेटसमोरच्या मोरी बंद केल्याने पावसाचे पाणी कंपनीच्या गेटसमोरच्या रस्त्यावर ५ फूट साचल्यामुळे संपूर्ण वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. पाणी तुंबल्यामुळे व रस्त्यात खड्डे असल्यामुळे वाहनचालकाला त्या पाण्यातून गाडी काढणे अवघड होत होते तसेच सकाळी कामावर जाणारे कामगर कामावर जाऊ शकले नाहीत. हे कळताच मुरुडचे तहसीलदार उमेश पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. नंतर कंपनीचे गेट उघडून कंपनीच्या आतील पाण्याचा मार्ग मोकळा करून तसेच कंपनीच्या जागेतून जाणारा नैसर्गिक पाण्याचा जो मार्ग कंपनीने बंद केला होता, तो तत्काळ मोकळा केल्याने काही तसांतच पाणी ओसरू लागले. त्यानंतर या विषयी तहसीलदार उमेश पाटील यांनी दिघी पोर्ट कंपनीचे व्यवस्थापक यांना नोटीस बजावून या संदर्भात येत्या ३८ तारखेला कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.दरम्यान, मुरुड ते रोहा या मुख्य रस्त्याला आगरदांडा येथे पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन असंख्य प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत असतो. पाणी ओसरल्यावरच वाहतूक सुरू होते. परिणामी तीन तीन तास देखील प्रवाशांना या ठिकाणी ताटकळत बसावे लागते. शनिवारी मुरुड तालुक्यात एकाच दिवसात १०५ मि.मी. पाऊस पडल्याने आगरदांडा येथे दिघी पोर्टच्या गेटपासून १ किलो मीटरच्या आसपास ५ फुटापेक्षा जास्त पाणी साचल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहतूककोंडी पाहावयास मिळाली.सार्वजनिक बांधकाम खाते याबाबत कोणतीच कार्यवाही करीत नसून, फक्त बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी त्याच्या या कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. दिघी पोर्ट कंपनीने तातडीने या बाबीकडे लक्ष देऊन या समस्याचे निरसन करावे, अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)
दिघीच्या हलगर्जीमुळे रस्त्यावर पाणी
By admin | Updated: June 26, 2016 00:18 IST