लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : नेरळ शहरात रस्ता रुंदीकरणाची कामे सुरू असताना सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. या कोंडीमुळे चालकांना आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागला. नेरळ रेल्वे स्टेशन ते नेरळ ग्रामपंचायत कार्यालय अशा सुमारे एक ते दीड तास वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. रस्त्यावर वाहने पार्क केल्याने ही कोंडी झाल्याचे बोलले जात होते. नेरळ शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. अशा वेळी रस्त्यांवर वाहतूककोंडी होणार नाही, याकडे लक्ष देण्याची जबाबदारी नेरळ वाहतूक पोलिसांची आहे. परंतु तसे होताना दिसत नसल्याने वाहतूककोंडीचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. नेरळ शहरातील बँक आॅफ इंडिया शाखेसमोर भर रस्त्यात कार पार्क केल्याने सोमवारी वाहतूककोंडी झाली. त्यामुळे नेरळ रेल्वे गेट ते नेरळ ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूककोंडीचा फटका लग्नाच्या वऱ्हाडालाही बसला. वाहनांचा रांगा लागलेल्या असताना याठिकाणी एकही वाहतूक पोलीस उपस्थित नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत होता. अनेक ठिकाणी चालक नो एंट्रीमधून वाहने चालवत होते.
नेरळ शहरात वाहतूककोंडी
By admin | Updated: May 9, 2017 01:25 IST