नागोठणे : गेल्या तीन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शनिवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास मुंबई - गोवा महामार्गावरील सुकेळी खिंडीत मोठ्या प्रमाणात दरड कोसळली. दरड कोसळताना महामार्गावर एकही वाहन नसल्याने दुर्घटना टळली. दरड कोसळल्यानंतर काही काळानंतर महाडच्या बाजूकडे जाणारी वाहने वाकण - आमडोशी - रोहेमार्गे कोलाड, तर मुंबईकडे जाणारी वाहने कोलाडहून रोहेमार्गे नागोठणेकडे वळविण्यात आली होती. मात्र काही वेळातच सुकेळी खिंडीच्या दोन्ही बाजूंना शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या. यात अवजड वाहने, एसटीसह कार, जीपसारखी अनेक वाहने अडकून पडली होती. महामार्गाचे ठेकेदार सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या यंत्रसामुग्रीद्वारे महामार्गावर पडलेली दगड तसेच माती बाजूला करण्यात सव्वादोन तासांचा अवधी लागल्याने सकाळी साडेदहा वाजता महामार्गावरील वाहतूक पुन्हा चालू करण्यात आली. वाहतूक सुरळीत चालू राहण्यासाठी नागोठणे पोलीस ठाण्यासह ऐनघर महामार्ग पोलीस महामार्गावर तैनात करण्यात आले होते. रायगड वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मनोज म्हात्रे यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन पाहणी करून वाहतूक पोलिसांना योग्य त्या सूचना दिल्या. दरम्यान, महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात खिंडीत प्रचंड प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. खोदकाम करताना योग्य ती काळजी घेतली नसल्यामुळे यापुढेही दरड कोसळण्याची भीती कायम असल्याचे दिसून येत आहे.
सुकेळी खिंडीत दरड कोसळली
By admin | Updated: July 3, 2016 03:06 IST